मतदारांचे हातपाय बांधून भाजपला मतदान करण्यासाठी आणा: येड्डियुरप्पा

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

भारतीय जनता पक्ष हा तुरुंग (प्रिझन), भाववाढ (प्राईस राईज) आणि पकोडा पार्टी बनला आहे. 
सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक 

बंगळूर : कर्नाटकच्या रणसंग्रामात प्रचाराच्या आघाडीवर सत्ताधारी भाजपची पिछेहाट होत असताना वाचाळ नेत्यांमुळे पक्षाच्या अडचणी आणखी वाढत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येड्डियुरप्पा यांनी जे मतदार मतदान करणार नाहीत अशांचे हातपाय बांधून त्यांना मतदान केंद्रांवर आणा आणि भाजपला मतदान करण्यासाठी भाग पाडा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते आज बेळगावमधील सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. त्यांच्या या विधानाला विरोधकांनी आक्षेप घेतल्याने यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

येड्डीयुरप्पा म्हणाले, "कार्यकर्त्यांनी आता स्वस्थ बसता कामा नये, मतदान न करणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढा आणि भाजपचे उमेदवार महांतेश दोद्दागोडर यांना मत देण्यास भाग पाडा.'' महांतेश हे कर्नाटकातील कित्तूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. येड्डियुरप्पांच्या या वक्तव्याला कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांना नैराश्‍य आले आहे, या नैराश्‍यातूनच ते कन्नड मतदारांना धमकावत आहेत. येड्डियुरप्पांनी लोकशाहीचा अवमान केल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. 

भारतीय जनता पक्ष हा तुरुंग (प्रिझन), भाववाढ (प्राईस राईज) आणि पकोडा पार्टी बनला आहे. 
सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक 

Web Title: Tie up peoples hands and legs bring them to vote for BJP says Yeddyurappa