राम मंदिराच्या हजारो फूट खाली जमिनीत ठेवणार 'टाइम कॅप्सूल'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची देखभाल कऱणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्र्स्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत माहिती दिली.

अयोध्या - राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची देखभाल कऱणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्र्स्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या हजारो फूट खाली एक टाइम कॅप्सूल ठेवलं जाणार आहे. ज्यामुळे भविष्यात मंदिराशी संबंधित काही वाद विवाद होऊ नये. या कॅप्सूलमध्ये मंदिराचा इतिहास आणि इतर माहिती असणार आहे. कामेश्वर चौपाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.

कामेश्वर चौपाल म्हणाले की, मंदिराबाबत झालेला संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील लढ्याने सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक धडा दिला आहे. राम मंदिराची उभारणी जिथं होणार आहे तिथं 2 हजार फूट खाली जमिनीत एक टाइम कॅप्सूल ठेवण्यात येईल. भविष्यात कोणी राम मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास कऱणार असेल तर त्याला राम जन्मभूमीशी संबंधित खरी माहिती मिळेल. तसंच नविन कोणता वाद होणार नाही. हे कॅप्सूल एका ताम्रपत्रात ठेवण्यात येणार आहे.

हे वाचा - लोखंड आणि स्टीलच्या वापराशिवाय उभारणार राम मंदिर

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी देशातील अनेक नद्यांचे पाणी आणि तिर्थस्थानांवरून माती आणली जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले होते त्या नद्या, स्थाने याठिकाणांचा समावेश आहे. या पवित्र पाण्याने भूमीपूजनावेळी अभिषेक कऱण्यात येईल असंही चौपल यांनी सांगितलं.

ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला भूमीपूजन करतील आणि पहिली वीट रचतील. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमीपूजन हे एखाद्या सणाप्रमाणे साजरं करण्याची योजना आहे. असंही म्हटलं जात आहे की देशात घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये यावेळी दिवे आणि मेणबत्ती प्रज्वलित करण्याचे आयोजनही केलं जाऊ शकतं.

हे वाचा - चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा

गेल्या आठवड्यात ट्रस्टची दुसरी बैठक पार पडली. मार्च महिन्यात राम ललाची मूर्ती तात्पुरती हलवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला केंद्र सरकारला ही जमीन निर्मितीसाठी देण्याचा निर्णय दिला होता. तसंच याची जबाबदारीही राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडे सोपवली होती.

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: time capsule will be placed down ram mandir in ayodhya