
'जनतेच्या आशीर्वादामुळं लालू यादव आता ठीक आहेत. ते बरे होऊन आपल्यामध्ये आले आहेत.'
Lalu Yadav : 'आंबेडकरांचं संविधान अन् देशाला पुढं न्यायचं असेल तर मोदी सरकार पाडावंच लागेल'
आरजेडी प्रमुख लालू यादव (RJD chief Lalu Yadav) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्णियात महागठबंधनच्या रॅलीला संबोधित केलं.
रॅलीला संबोधित करताना लालू यादव म्हणाले, आम्ही आणि नितीश एक झालो आहोत. ही युती विचारधारेची आहे. यानंतर बिहारमध्ये 2024-2025 च्या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड मोडले जातील, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.
यासोबतच लालू यादव यांनी ट्विटव्दारे भाजपवर निशाणा साधलाय. लालूंनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'आपल्याला देश वाचवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं (Babasaheb Ambedkar) संविधान वाचवायचं आहे. बिहार आणि देशाला पुढं न्यायचं आहे, तसंच अल्पसंख्याकांचं रक्षण करायचं आहे. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं सरकार पाडण्याची योग्य वेळ जवळ आली आहे.'
एकता हीच आमची ताकद - तेजस्वी यादव
लालू यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, 'बिहारमध्ये ज्या प्रकारे युती झाली आहे. त्याचप्रमाणं देशातही युती आहे. यात वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. प्रत्येकाचा ध्वज वेगळा आहे. मात्र, तरीही आपण सर्व एक आहोत. हीच आमची ताकद आणि आमची ओळख आहे.'
तेजस्वी यादव पुढं म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळं लालू यादव आता ठीक आहेत. ते बरे होऊन आपल्यामध्ये आले आहेत. त्यांचा खूप छळ करण्यात आला. पण, ते घाबरले नाहीत. जातीयवादी शक्तींसमोर गुडघे टेकले नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.