टिपू सुलतान जयंती रद्द ;भाजप निर्णयावर ठाम तर,काँग्रेसचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

टिपू सुलतान जयंती उत्सव रद्द केल्यावरून कर्नाटक विधानसभेत गोंधळ झाला. काँग्रेसच्या सदस्यांनी टिपू जयंती रद्द केल्याबद्दल आक्षेप घेतला व सरकारने आदेश मागे घेण्याची विनंती केली. परंतु, सत्ताधारी पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळे सत्ताधारी व काँग्रेस सदस्यांत वादावादी होऊन सभागृहाचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

बंगळूर : टिपू सुलतान जयंती उत्सव रद्द केल्यावरून कर्नाटक विधानसभेत गोंधळ झाला. काँग्रेसच्या सदस्यांनी टिपू जयंती रद्द केल्याबद्दल आक्षेप घेतला व सरकारने आदेश मागे घेण्याची विनंती केली. परंतु, सत्ताधारी पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळे सत्ताधारी व काँग्रेस सदस्यांत वादावादी होऊन सभागृहाचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहाच्या कामकाजाला सुरवात होताच उद्योगपती सिद्धार्थ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष कृष्णा रेड्डी अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांची विधानसभाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव सादर केला. आमदार बसवराज बोम्मई यांनी त्याला अनुमोदन दिले. काँग्रेस आणि जेडीएस पक्षांनी उमेदवारी अर्ज सादर न केल्याच्या पार्श्वभूमीवर हेगडे-कागेरी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर नव्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पुढील कामकाजाला सुरवात झाली.

टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याबद्दल काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला. भाजप सरकारने आपला आदेश मागे घेण्याची मागणी केली. या विषयावर चर्चा घडवून आणण्याचाही त्यांनी आग्रह धरला. त्याबरोबर मुख्यमंत्री येडियुरप्पा रागाने सभागृहाबाहेर निघून गेले. टिपू सुलतान जयंती विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव सादर केलेला नाही, त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यास वेळ देणार नसल्याचे सांगून अध्यक्षांनी काँग्रेसची मागणी फेटाळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tipu sultan Birth Anniversary Karnataka Vidhansabha Confusion