तृणमूलचे खासदार बंदोपाध्याय यांना अटक

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

तृणमूलच्या सर्व नेत्यांना अटक करायची आहे. त्यांच्या या कृतीने मला धक्का बसला असला तरी मी घाबरलेले नाही. मला अटक करण्याचे मी त्यांना जाहीर आव्हान देते. मला त्यांची हिंमत दिसू द्या. मोदी नागरिकांचा आवाज दाबून ठेवू शकत नाहीत.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

कोलकता - तृणमूल कॉंग्रेसच्या संसदीय समितीचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांना आज रोझ व्हॅली चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. एकाच आठवड्यात सीबीआयने अटक केलेले तृणमूल कॉंग्रेसचे ते दुसरे खासदार आहेत.

बंदोपाध्याय हे आज सकाळी अकराच्या सुमारास सीबीआयच्या कार्यालयात आले. येथे त्यांची चार तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. चार दिवसांपूर्वी खासदार तपस पाल यांनाही सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान, बंदोपाध्याय यांच्या अटकेचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निषेध केला आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठी सीबीआय, सक्तवसुली संचालनालय, प्राप्तीकर विभाग यांचा वापर केला जात असल्याची टीकाही बॅनर्जी यांनी केली. बंदोपाध्याय यांच्या पाठिशी सर्व पक्ष असून या अटकेविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गोध्रा दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. मोदी हे कोट्यवधी रुपयांचे कपडे घालतात. हा पैसा कोठून येतो? अदानींना अटक का होत नाही?, असे प्रश्‍नही बॅनर्जी यांनी उपस्थित केले. बंदोपाध्याय यांच्या अटकेनंतर बॅनर्जी यांनी तत्काळ सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावत चर्चा केली.

भाजप कार्यालयावर हल्ला
खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक झाल्याचे वृत्त समजताच तृणमूल कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपच्या कोलकता येथील मुख्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तृणमूलच्या नेत्यांनी या हल्ल्यामध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याबाबत इन्कार केला असला तरी भाजपने मात्र तृणमूलवरच आरोप केले आहेत.

Web Title: TMC MP arrested in a scam