नोटाबंदीच्या परिणामांचे चित्र दिसणारच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नोटाबंदीच्या परिणामांचे खरे चित्रच या अर्थसंकल्पात दिसणार नसल्याचा प्रहार विरोधकांनी केला आहे, तर या मुद्द्यावर संसदेत आक्रमक राहण्याचे कॉंग्रेस, माकपने स्पष्ट केले आहे

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला संसदेत मांडला जाणार असताना विरोधी पक्षांनी आज सर्वपक्षीय बैठकीत अर्थसंकल्पी अधिवेशन अलीकडे आणण्याच्या निर्णयावरून प्रश्‍न उपस्थित केले. नोटाबंदीच्या परिणामांचे खरे चित्रच या अर्थसंकल्पात दिसणार नसल्याचा प्रहार विरोधकांनी केला आहे, तर या मुद्द्यावर संसदेत आक्रमक राहण्याचे कॉंग्रेस, माकपने स्पष्ट केले आहे.

तृणमूल कॉंग्रेसने अर्थसंकल्पावर बहिष्कार घालण्याची घोषणा करून विरोधकांमध्ये आघाडी घेतली आहे. संसद अधिवेशनाच्या आधी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याच्या प्रथेनुसार आज सरकारतर्फे ही बैठक सकाळी साडेअकराला झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांच्यासह कॉंग्रेस, माकप, भाकप, समाजवादी पक्ष, द्रमुक, बहुजन समाज पक्ष, राजदसह सर्व प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, तृणमूल कॉंग्रेस आणि शिवसेनेने या बैठकीकडे पाठ फिरवली. कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी अर्थसंकल्प अलीकडे आणण्यास विरोध दर्शविताना अर्थसंकल्पात अशा घोषणा केल्या जाऊ नयेत, ज्यामुळे पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल. सरकारने तसे करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा (नऊ फेब्रुवारी) झाल्यानंतर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी नोटाबंदी, अंतर्गत सुरक्षा, सीमेवरील घुसखोरी, सर्जिकल स्ट्राइकनंतर शस्त्रसंधीचे सातत्याने होणारे उल्लंघन, असहिष्णुता, नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये यावर अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी मागणी केली.

सीताराम येचुरी यांनी अर्थसंकल्पाचे वेळापत्रक बदलल्यावरून सरकारवर हल्ला चढवला. नवे वेळापत्रक पूर्णपणे अशास्त्रीय असून, नऊ दिवसांत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजुरीला लागणारा वेळ पाहता नऊ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पाची मंजुरी शक्‍य नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातच त्यावर चर्चा व्हावी, असे सांगत अर्थसंकल्पात नवी उद्दिष्टे ठरवताना मावळत्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे आकडे महत्त्वाचे असतात; परंतु तिमाहीचे आकडे फेब्रुवारीमध्ये येणार असताना त्याआधीच अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने नोटाबंदीच्या निर्णयानंतरचे अर्थव्यवस्थेचे वस्तुस्थितीदर्शक चित्रण अर्थसंकल्पात उमटणार नाही, असे टीकास्त्र येचुरी यांनी सोडले.
अनंतकुमार यांनी मात्र अर्थसंकल्पावरील चर्चा आणि मंजुरीची वेळ दोन्ही सभागृहांच्या कामकाजविषयक सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविली जाईल, असे स्पष्ट केले. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असून, अधिवेशनाच्या दोन्ही टप्प्यांमध्ये कामकाज व्हावे, अशी इच्छा आहे असे सांगितले. उद्या राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार असून, उद्याच आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाणार आहे. नऊ फेब्रुवारीपर्यंत धन्यवाद प्रस्ताव आणि अर्थसंकल्प मंजुरीचा प्रयत्न असेल. आजच्या बैठकीला तृणमूल कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या अनुपस्थितीबद्दल अनंतकुमार यांनी गुळमुळीत उत्तर दिले.

Web Title: TMC not to attend Parliament on Budget day