हिंसाचारग्रस्त निवडणुकीत 'तृणमूल'ची बाजी; बंगालमध्ये भाजपचा उदय!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

कोलकाता : हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला अपेक्षेनुसार सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काल (गुरुवार) रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार, तृणमूल कॉंग्रेसला 20,441 जागा मिळाल्या होत्या. राज्यात भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येत असल्याची चिन्हे या निवडणुकीतून दिसली आहेत. भाजपने कालपर्यंत 5,465 जागा जिंकल्या होत्या. 

गेल्या दहा वर्षांत प्रथमच पश्‍चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपला ग्रामपंचायतीत स्थान मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया राज्यातील भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेत असणारा कम्युनिस्ट पक्षाची यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. कम्युनिस्ट पक्षाला कालपर्यंत 1,415 जागा मिळाल्या होत्या. 993 जागा जिंकून कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. 

पश्‍चिम बंगालमधील 621 जिल्हा परिषद, 6,123 पंचायत समिती आणि 31,802 ग्रामपंचायतींसाठी 14 मे रोजी मतदान झाले होते. एकूण 48,650 जागांपैकी 16,814 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाली होती. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना कमालीचा हिंसाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील उमेदवारांना अर्जही दाखल करू दिले नाहीत, असा आरोपही करण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये झालेल्या हिंसाचारात किमान 12 जणांचा मृत्यू झाला, तर 43 जण गंभीर जखमी झाले आहेत. कम्युनिस्ट पक्ष आणि कॉंग्रेसनेही या निवडणुकीवर टीका केली आहे. 

नीट अहवाल पाठवा! 
निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्‍चिम बंगाल सरकारला अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या अहवालात अनेक तपशील वगळण्यात आले आहेत. त्यामुळे हा अहवाल पुन्हा पाठविण्याचे आदेश गृहमंत्रालयाने बंगालच्या मुख्य सचिवांना दिले, असे वृत्त 'इकॉनॉमिक टाईम्स'ने प्रसिद्ध केले आहे. 

Web Title: TMC swept elections in West Bengal