आजचा दिवस खातेदारांचाच 

पीटीआय
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी होत असल्याने बॅंकांचे अन्य कामकाज प्रलंबित राहिले आहे. यामुळे आज (शनिवारी) फक्त ज्येष्ठ नागरिक आणि संबंधित बॅंकेच्या खातेदारालाच जुन्या नोटा बदलून मिळणार आहेत. 

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी होत असल्याने बॅंकांचे अन्य कामकाज प्रलंबित राहिले आहे. यामुळे आज (शनिवारी) फक्त ज्येष्ठ नागरिक आणि संबंधित बॅंकेच्या खातेदारालाच जुन्या नोटा बदलून मिळणार आहेत. 

बॅंकांचे कामकाज शनिवारी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आज केवळ संबंधित बॅंकेचे खातेदार आणि ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेतून जुन्या पाचशे व हजारच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. याविषयी बोलताना इंडियन बॅंकिंग असोसिएशनचे राजीव रिशी म्हणाले, ""हा नियम देशभरातील सर्व बॅंकांना लागू आहे. बॅंका सुरळीत कामकाज सुरू ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. बॅंकांतील गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली तरी, बॅंकांकडे देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. यामुळे उद्या केवळ खातेदार आणि ज्येष्ठ नागरिकांनाच जुन्या नोटा बदलून मिळतील. बॅंका आजचा दिवस अन्य प्रलंबित कामकाज पूर्ण करण्यासाठी वापरणार आहेत.'' सर्व बॅंका रविवारी बंद राहणार आहेत. 

बॅंक खात्यांचा गैरवापर नको 
जन-धन खाते, महिला आणि कामगारांनी त्यांच्या बॅंक खात्याचा काळा पैसा ठेवण्यासाठी गैरवापर करू दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. 

पाचशे व हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरूपातील काळा पैसा नव्या नोटांमध्ये रूपांतरित करण्यासाठी अन्य व्यक्तींच्या बॅंक खात्यांचा वापर होत असल्याचे समोर येत आहे. काही प्रकरणांमध्ये तर अशा प्रकारे बॅंक खाते वापरण्यासाठी संबंधित व्यक्तीला पैसेही दिले जात आहेत. सरकारने याआधी जाहीर केले आहे, की अडीच लाखांपर्यंतच्या जमेवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवणार नाही. जन धन खात्यासाठी ही मर्यादा 50 हजार रुपये आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे, की स्वत:च्या खात्यात दुसऱ्यांचा काळा पैसा ठेवणाऱ्या व्यक्तींना प्राप्तिकरासह दंड भरावा लागेल. अशा प्रकारे खात्याचा गैरवापर करू देणाऱ्या व्यक्तींवर प्राप्तिकर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. 
 

काळा पैसा रूपांतरित करण्याच्या मोहाला नागरिकांनी बळी पडू नये. अशा प्रकारे कृत्य करून ते काळा पैसा पांढरा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होत आहेत. 
- केंद्रीय अर्थ मंत्रालय

Web Title: Today, the day of the account holder