पोलिसांच्या गोळीबारात "ऍपल'चा एरिया मॅनेजर ठार

Police firing
Police firing

लखनौ : येथे हात दाखविल्यानंतरदेखील गाडी न थांबवताच तशीच पुढे नेणाऱ्या "ऍपल'चा एरिया मॅनेजर विवेक तिवारी याच्या गाडीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येथील गोमतीनगर परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी कॉन्स्टेबल संदीप आणि प्रशांत चौधरी या दोघांवर खुनाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून, कॉंग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरज भासल्यास आपण या प्रकरणाची चौकशी "सीबीआय'कडे सोपवू, असे म्हटले आहे.

सध्या या घटनेचा तपास विशेष तपास पथक करत आहे. तिवारी हे शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका माजी सहकाऱ्यासोबत कारमधून प्रवास करत होते, या वेळी लखनौमधील गोमतीनगर भागामध्ये त्यांची कार येताच दोन पोलिसांनी त्यांना गाडी थांबविण्याची सूचना केली, यानंतर तिवारींनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या कारची पोलिसांच्या बाईकला जोराची धडक बसली, यानंतर हीच कार शेजारच्या भिंतीवर जाऊन आदळली.

कारमधील संशयास्पद हालचाली पाहून कॉन्स्टेबल प्रशांतकुमार यांनी कारच्या समोरील काचेवर गोळी झाडली, असे लखनौचे पोलिसप्रमुख कलानिधी नैथानी यांनी सांगितले. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विवेक यांचा पुढे रुग्णालयात मृत्यू झाला. गोळी लागल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले असून, यासंबंधीचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. 

आत्मरक्षेसाठी गोळीबार : प्रशांतकुमार 
या वेळी विवेक यांच्यासोबत असलेल्या माजी कर्मचारी सना खान यांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबार करणारे कॉन्स्टेबल प्रशांतकुमार यांनी आपण आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या कॉंग्रेस पक्षाने मृत विवेक तिवारी आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करताना सरकारवर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com