दहशतवादी बुऱ्हान वणीचा शेवटचा कमांडरही ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मे 2019

सुरक्षा दलांकडून आज सकाळी शोधमोहीम राबविण्यात येत होती. त्या वेळी शोपियॉंमधील इमाम साहिब भागात ही चकमक उडाली. सुरवातीला दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला.

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर आज (शुक्रवार) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये "हिजबुल'चा मारला गेलेला कमांडर बुऱ्हान वणी याचा शेवटचा कमांडरही ठार झाल्याची शक्यता आहे.

सुरक्षा दलांकडून आज सकाळी शोधमोहीम राबविण्यात येत होती. त्या वेळी शोपियॉंमधील इमाम साहिब भागात ही चकमक उडाली. सुरवातीला दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर संबंधित भागाला सुरक्षा दलांच्या जवानींनी वेढा दिला होता. त्यानंतर मोठी चकमक उडाली. त्यात तीन दहशतवादी ठार झाले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. उशिरापर्यंत ही चकमक सुरूच होती, असे सांगण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ जप्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सुरक्षा दलांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा दलांचे जवान आणि दगडफेक करणारे स्थानिक नागरिक यांच्या संघर्ष झाला. या वेळी सुरक्षा दलांने केलेल्या कारवाईत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लतीफ टायगरचा खात्मा?
प्राथमिक माहितीनुसार, चकमकीत ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यातील एकाचे नाव लतीफ टायगर असल्याचे मानले जाते. लतीफ हा "हिजबुल'चा मारला गेलेला कमांडर बुऱ्हान वणी याचा सहकारी होता. वनीच्या दहा सहकाऱ्यांपैकी इतर नऊ जणांचा यापूर्वीच खात्मा करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top Hizbul commanders including Burhan Wanis last aide killed in Shopian encounter