'एक देश, एक निवडणूक' बैठकीकडे या प्रमुख पक्षांनी फिरविली पाठ

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती.

नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल, बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक, पीडीपी नेते मेहबूबा मुफ्ती, वायएसआरचे जगनमोहन रेड्डी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी उपस्थित होते.

तर दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, द्रमुक, तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती यांनी बैठकीस येण्यास यापूर्वी नकार दिला होता. सीताराम येचुरी आणि डी. राजा हे बैठकीत उपस्थित होते, मात्र, 'एक देश, एक निवडणूक' या विषयाला त्यांनी विरोध दर्शविला. 

ईव्हीएमबाबतच्या बैठकीत सामील झाले असते : मायावती
जर ही बैठक ईव्हीएमबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केली असती, तर मी या बैठकीस अवश्य उपस्थित राहिले असते, असे ट्विट मायावती यांनी आज केले होते.

प्रथम श्वेत पत्र तयार करावे : ममता
'एक देश, एक निवडणूक' यासाठी घाई करू नये. तसेच या बाबत एक श्वेत पत्र जारी करावे, ज्यावर सर्व प्रमुख नेते आपले विचार मांडतील, अशा आशयाचे पत्र काल ममता यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना दिले होते. यासाठी सर्वांना थोडा वेळ द्यावा. जर मोदी यासाठी तयार असतील, तर या विषयावर आम्ही आमचे मत नोंदवू, असेही ममतांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top political parties of India rejected to join meeting of one nation one election