देशाच्या न्यायव्यवस्थेची परंपरा मजबूत : सरन्यायाधीश 

पीटीआय
रविवार, 4 ऑगस्ट 2019

अलीकडील काळात काही गट आणि व्यक्तींचे वर्तन भांडखोर आणि बेपर्वा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशा घडामोडींचे स्वरूप अपवादात्मक राहायला हवे.

- रंजन गोगई, सरन्यायाधीश

गुवाहाटी : अलीकडील काळात काही गट आणि व्यक्तींचे वर्तन भांडखोर आणि बेपर्वा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशा घडामोडींचे स्वरूप अपवादात्मक राहायला हवे. देशाच्या न्यायव्यवस्थेची परंपरा मजबूत असून, ती या प्रकारांवर मात करेल असा मला विश्वास आहे, असे मत सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी आज मांडले. 

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या सभागृहाच्या भूमिपूजनप्रसंगी गोगई बोलत होते. भांडखोर आणि बेपर्वा वर्तन करणाऱ्या स्वछंदी गट आणि व्यक्तींना चाप लावण्यात यश येईल, अशी मला आशा आहे. त्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेच्या परंपरेची मदत होईल, असेही ते म्हणाले.

"देशातील नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. न्यायाधीश आणि न्यायालये जो न्यायनिवाडा करतात, त्यामुळे हा विश्वास निर्माण झाला आहे, हे न्यायव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने ध्यानात ठेवावे, असे मी सांगू इच्छितो. न्यायव्यवस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा,'' असेही गोगई यांनी सांगितले. 

एक हजार खटले 50 वर्षांपासून पडून 

देशभरातील न्यायालयांमध्ये 50 वर्षांपासून सुमारे एक हजारांपेक्षा अधिक खटले पडून आहेत; तर सुमारे दोन लाख खटले 25 वर्षांपासून पडून आहेत. या घटल्यांचा निपटारा करण्याचे आवाहन मी नुकतेच उच्च न्यायालयांच्या सर्व न्यायाधीशांना केले आहे. न्यायालयांत पडून असलेल्या 90 लाख खटल्यांपैकी 20 लाखांपेक्षा अधिक खटल्यांमध्ये अद्याप साधे समन्सही बजावण्यात आलेले नाही, असा खुलासाही गोगई यांनी या वेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tradition of the countrys justice system is strong says CJI Ranjan Gogoi