'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

"आयसीएफ' कारखान्यात केवळ 18 महिन्यांत "टी-18' गाडीची निर्मिती पूर्ण होणे ही रेल्वेच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे. 

- अश्‍विनी लोहाणी, अध्यक्ष, रेल्वे मंडळ

नवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत "ट्रेन-एटीन' म्हणजेच "टी-18'च्या चाचण्यांना आजपासून सुरवात झाली. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी या गाड्या सक्षम आहेत. पुढील महिन्यापासूनच सध्याच्या शताब्दी गाड्यांच्या जागी टप्प्याटप्प्याने नव्या गाड्या चालविण्याचा रेल्वेचा मानस आहे. यापाठोपाठ सध्याच्या राजधानी गाड्यांच्या जागी येणाऱ्या प्रस्तावित "ट्रेन-20' गाड्यांची तयारीही रेल्वेने वेगाने सुरू केली आहे. "सकाळ'ने याबाबतचे वृत्त याआधीच दिले आहे. 

सुरेश प्रभू यांच्या काळातच चाचण्या केलेल्या "टॅल्गो' गाड्यांना तांत्रिकतेची ठेच लागल्यावर त्यांचे पुढे काय झाले हे रेल्वेने गुलदस्तात ठेवले आहे. चेन्नईतील "इंटिग्रल कोच फॅक्‍टरी'त (आईसीएफ) नव्या "टी-18' गाडीची निर्मिती करण्यात आली आहे. 100 कोटी रुपये खर्चाच्या व बुलेट ट्रेनप्रमाणेच आकर्षक दिसणाऱ्या या गाडीचे उद्‌घाटन रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्‍विनी लोहाणी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. दिल्ली मेट्रोच्याच धर्तीवर या संपूर्ण वातानुकूलित गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.

इंजिनविरहीत व डब्यांमधील कपलिंगची रचना अमूलाग्र बदलल्याने वळणावर वेग कमी करण्याची गरज पडणार नाही, तसेच सध्याच्या शताब्दी-राजधानी गाड्यांना अधूनमधून जे झटके बसतात, त्यापासूनही मुक्तता होईल. 2019-20 च्या अखेरीस अशा पाच गाड्यांची निर्मिती चेन्नईतील कारखान्यात करण्याचा रेल्वेचा मानस आहे. शताब्दीच्या तुलनेत या गाड्या सरासरी 15 टक्के कमी वेळात पोचतील असा रेल्वेचा अंदाज आहे. 

गाडीची वैशिष्ट्ये 

झट्‌कन वेग पकडून तेवढ्याच कमी वेळात थांबणे हे या गाड्यांचे वैशिष्ट्य असेल. या वातानुकूलित गाडीला 16 डबे असतील. त्यात एक्‍झिक्‍यूटिव्ह व सामान्य अशा दोन वर्गांतील डब्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 52 व 78 आसनांची क्षमता असेल. या गाडीला दिल्ली मेट्रोसारखेच स्वयंचलित दरवाजे असल्याने प्रवाशांनी धावतपळत जाऊन रेल्वे पकडण्याचे प्रकार थांबणार आहेत. 

"रामायण एक्‍स्प्रेस' फुल्ल! 

रामायणातील सर्व स्थळांची यात्रा घडविणाऱ्या रामायण सर्किट या रेल्वेगाडीचे उद्‌घाटनही आज सफदरजंग स्थानकावर झाले. या पहिल्या गाडीतील प्रत्येकी 15 हजार रुपयांची सर्व तिकिटे अवघ्या पंधरा दिवसांत आरक्षित झाली आहेत. नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयागराज, श्रुंगपूर, चित्रकूट, नाशिक रोड, हंपी व रामेश्वरम या स्थानकांवर थांबून प्रवाशांना तेथील रामायणकाळातील सैरसपाटा करण्यात येईल.

या सर्किटमधील गाड्या राजकोट, मदुराई व जयपूरपासून सुरू होतील व त्या अयोध्यामार्गे जातील. महाराष्ट्रातील नाशिक हे एकमेव शहर रामायणात उल्लेखित असल्याने तेही नव्या एक्‍स्प्रेसच्या मार्गावर आहे. या एका गाडीत 800 यात्रेकरू असतील. ज्यांना नेपाळमधील जनकपूरला जायचे आहे त्यांना सीतामढीपासून पुढे रस्ता प्रवासाची सोय केली जाईल. 

Web Title: Train 18 in place with Shatabdi