कॉंग्रेसचा इतिहास गैरव्यवहारांचा

पीटीआय
बुधवार, 14 डिसेंबर 2016

जेटली म्हणाले
- भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॉंग्रेसने काहीच केले नाही
- कॉंग्रेसच्या काळात मोठ्या नोटांचा वापर वाढला
- रोख रकमेच्या वापराची किंमत मोजावीच लागते
- रोकड संपणार नाही, पण डिजिटल व्यवहारांना प्राधान्य
- पुढील तीन आठवड्यांत समस्या कमी होतील

 

नोटाबंदीवरून अर्थमंत्री जेटली यांची टीका

नवी दिल्ली :  केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या काळामध्ये प्रचंड गैरव्यवहार झाले. कॉंग्रेसला गैरव्यवहारांचा मोठा इतिहास असल्यानेच या पक्षाला आता नोटाबंदीचा त्रास होतो आहे. केंद्राने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताचा प्रवास आता "लेस कॅश' आणि "डिजिटल पेमेंट'च्या दिशेने सुरू होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या उपाययोजनेमुळे करसंकलन तर वाढेलच, पण त्याचबरोबर करबुडवेगिरीलाही लगाम बसेल असे त्यांनी सांगितले.

प्रत्यक्ष रोख देऊन केले जाणारे व्यवहार कमी झाल्यानंतर मोठ्या व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर सुरू होईल. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण आपोआप कमी होईल. लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून रिझर्व्ह बॅंक दररोज विशिष्ट प्रमाणात एटीएममध्ये चलनाचा भरणा करत आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात चलन लोकांच्या हाती येईल तेव्हा त्यांच्या समस्या आपोआप दूर होतील, असेही त्यांनी नमूद केले. लोकांनी नोटाबंदीचे फायदेदेखील विचारात घ्यावे, कालपरवापर्यंत जो पैसा व्यवहारात नव्हता तो आता बॅंकिंग व्यवस्थेमध्ये आला आहे, आता या पैशावर लोकांना कर भरावा लागणार असल्याने सरकारचे उत्पन्नदेखील वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दहशतवादाला आळा
नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादासाठी वापरला जाणारा पैसा आपोआप कमी होईल, कर व्यवस्थेमधील गळतीची ठिकाणे रोखण्याची तरतूददेखील "जीएसटी'मध्ये करण्यात आली आहे. आमचे सरकार नोटाबंदीच्या मुद्यावर संसदेमध्ये चर्चा करण्यासाठी तयार असून, यासाठी फक्त याचे सकारात्मक पैलू आपण विचारात घ्यायला हवेत. देशाच्या हितासाठी विरोधी पक्षांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत, असे जेटली यांनी नमूद केले.
 

Web Title: Transaction history non-Congress