positive story: कोरोना रुग्णांवर उपचारात 'म्यूझिक थेरपी' आणि वाचनालयाची सुरुवात

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 11 October 2020

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनाचे 60 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

वडोदरा/शिवमोग्गा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनाचे 60 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील काही दिवसांपुर्वी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्यवस्थित वागणुक दिली जात यावरुन बरीच टिका झाली होती. यामध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरबद्दलच्या बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. काही व्हिडिओही व्हायरल झाले होते. त्यावरुन सोशल मिडियावरही संतापाची मोठी लाट उसळली होती. 

म्युझिक थेरपी-
 पण आता देशातील अशी काही कोव्हिड सेंटर समोर आली ज्यांचं कौतूक मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. यामध्ये कर्नाटकातील आणि गुजरातमधील कोव्हिड सेंटरचा समावेश होतो. वडोदरामधील सयाजीराव गायकवाड रुग्णालयात (Sayajirao Gaekwad Hospital in Vadodara) कोरोना रुग्णांना उपचारदरम्यान 'म्यूझिक थेरपी, दिली जात आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे की, हा उपचारातीलच एक भाग असून रुग्णांना प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटावे यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

वाचनालये-
कर्नाटकमध्येही कोरोना रुग्णांना वेळ आनंदाने घालवता यावा यासाठी एक चांगला स्तुत्य उपक्रम रुग्णालयाने सुरु केला आहे. दिवसभर कोरोना रुग्णांना त्यांचा वेळ सदूपयोगी घालण्यासाठी शिवमोग्गातील जिल्हा रुग्णालय आणि सागरा तालुका उप जिल्हा रुग्णालयाने रुग्णलयात लहानशी 'वाचनालये' सुरु केली आहेत. 'रुग्णांचा तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांना निवांत वाटण्यासाठी वाचनालय सुरु करण्याचा उपक्रम खूप फायदेशीर ठरत आहे, अशी माहिती शिवमोग्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (Shivamogga Institute of Medical Sciences) संचालक डॉक्टर श्रीधर यांनी दिली आहे. 

जगभरासह भारतात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तसेच देशातील कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा 60 लाखांच्या वर गेला आहे. सध्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात दिसून येत आहे. तसेच येथे कोरोनाच्या रुग्णांची बरे होण्याचा टक्काही जास्त आहे. या राज्यात देशातील कोरोना रुग्णांपैकी 61 टक्के रुग्ण असून देशाच्या 54.3 टक्के रुग्ण या राज्यांतून बरे झाले आहेत. 

महाराष्ट्रात सध्या 12 लाख 29 हजार 339 रुग्ण रिकव्हर झाले असून 2 लाख 36 हजार 947 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातही सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: treatment on corona patients of music therapy and library