वीज वाहिन्यांवर झाड कोसळून एक जण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

मुरगाव : वास्को येथील स्वातंत्र्य पथावरील अशोकाचे एक जीर्ण झालेले झाड वीजवाहिन्यांवर कोसळल्याने झाडाखाली असलेले सतिश गांवकर (वय 41 वर्ष, रा. धारबांदोडा) हे जागीच ठार झाले. तुटलेल्या वीज वाहक तारांमध्ये सापडल्याने त्यांना मोटरसायकल बाहेर काढता आली नाही आणि त्यातच त्यांना जीव गमवावा लागला. ही घटना आज (शनिवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

वास्को येथील स्वातंत्र्य पथ मार्गाच्या दुतर्फा अशोकाची जीर्ण झालेली झाडे आहेत. जीर्ण झाल्याने गेल्या काही वर्षांपासून एकेक करून ती कोसळत आहेत. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतिश हे उसगावहून सडा येथे स्वातंत्रपथ मार्गावरुन जात असताना अशोकाचे एक भलेमोठे झाड कोसळले. मोटरसायकल वरून जात असलेले सतिश वीज वाहिन्यामध्ये सापडले गेल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मयत सतिश गांवकर हे ट्रक ड्रायव्हर होते. सडा येथील ट्रकमधील काही सामान घेण्यासाठी ते पल्सर मोटरसायकलने सडा येथे जात असताना त्यांना मृत्यूने गाठले.

या घटनेची माहिती वास्को पोलिस आणि अग्निशमन दलाला मिळताच ते घटनास्थळी धाऊन गेले. जिवंत वीज वाहिन्यांवर झाड कोसळल्याने त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
वास्को पोलिस उपनिरीक्षक रितेश तारी यांनी घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान, स्वातंत्र्यपथ मार्गावरील जीर्ण झालेल्या अशोकाच्या झाडांचा प्रश्न आज झालेल्या अपघाताने पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नगरसेवक दाजी साळकर यांनी डेंजर झोनमधील ही सर्व जीर्ण झाडे त्वरीत हटवावी, अशी मागणी केली आहे. सोमवारी मामलेदार सतिश प्रभू यांची भेट घेऊन श्री साळकर जीर्ण झाडे हटविण्याची मागणी करणारे निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सकाळी घडलेली घटना भविष्यातील संकटाची कल्पना देणारी असून याची दखल घेऊन उर्वरीत जीर्ण झाडे विनाविलंब हटवावी, अशी मागणी त्यांनी केली. बिगर सरकारी संस्थांनी जीर्ण झाडे हटविण्यास विरोध करु नये, असेही आवाहन साळकर यांनी यावेळी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree collapsed on the electricity line, one killed on the spot