लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना शत-शत नमन! मोदींसह दिग्गजांनी केले अभिवादन

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

गुजरातमधील केवाडिया येथे सरदार सरोवरावर पटेलांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात आला आहे. एकतेचे प्रतिक म्हणून निर्माण केलेल्या या पुतळ्यास 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असे म्हणतात.

केवाडिया : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती! आजचा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवर येथील त्यांच्या भव्यदिव्य मूर्तीचे दर्शन घेतले. आज पहाटे त्यांनी सरदार पटेलांच्या या स्मारकाला भेट दिली व फुले वाहून अभिवादन केले.  

 

गुजरातमधील केवाडिया येथे सरदार सरोवरावर पटेलांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात आला आहे. एकतेचे प्रतिक म्हणून निर्माण केलेल्या या पुतळ्यास 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असे म्हणतात. त्यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड व विविध कार्यक्रमांचे आयोजन स्मारकाजवळ करण्यात आले आहे. मोदींनी आज सकाळपासूनच या कार्यक्रमास उपस्थिती लावली आहे. 

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीमिनित्त देशभरात एकता दौडेचे आयोजन करण्यात येते. पुणे, मुंबई व इतर शहरांमध्येही आज सकाळी एकता दौडेचे आयोजन करण्यात आले होते. तर नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर नेत्यांनी सरदार पटेलांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली दिली. 

 

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी भारताततील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribute by PM Narebndra Modi to Sardar Vallabhbhai Patel on his 144th birth anniversary