'तृणमूल'च्या खासदारांचा पहिले दोन दिवस बहिष्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नरेंद्र मोदी हटाव हा आमचा एककलमी कार्यक्रम आहे.
- कल्याण बॅनर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे नेते

नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ पक्षाचा निर्णय

कोलकता- केंद्र सरकारच्या नोटाबंदीविरोधात तृणमूल कॉंग्रेसचा निषेध कायम असून, बुधवार (ता. 1) पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला पहिले दोन दिवस अनुपस्थित राहण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतल्याचे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे.

राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थसंकल्प सादरीकरणावर बहिष्कार टाकण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबत पक्षाने त्यांच्या खासदारांसाठी पक्षादेश काढला आहे. संसदेला विश्‍वासात न घेता केंद्राने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिले दोन दिवस पक्षाचे सर्व खासदार अनुपस्थित राहतील, असे त्यात म्हटल्याचे पक्षाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. अर्थमंत्री अरुण जेटली एक फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा निर्णय हा मूर्खपणाचा आहे. तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या दोन खासदारांना चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याची टीका पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या तृणमूल कॉंग्रेसने केली आहे.

पक्षाचे लोकसभेतील नेते सुदीप बंदोपाध्याय आणि तपस पाल यांना केलेल्या बेकायदेशीर अटकेचा मुद्दा तृणमूल कॉंग्रेस या अधिवेशनात उठवणार आहे. केंद्रातील सत्तारूढ पक्षाने राजकीय सूडापोटी आपल्या अधिकारांचा; तसेच सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करून बॅनर्जी म्हणाले, ""यापुढेही बंदोपाध्याय हेच आमचे लोकसभेतील नेते असतील. बहिष्काराच्या काळात खासदार सौगत रॉय हे यांची पक्षाने लोकसभेतील उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.''

येत्या एक फेब्रुवारीला सरस्वती पूजा असून, बंगालच्या दृष्टीने तो मोठा दिवस असल्याने तृणमूल कॉंग्रेस संसदेत उपस्थित राहणार नसल्याचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी सांगितले.

Web Title: Trinamool MPs boycotted the first two days