तिहेरी तलाकला शरियात स्थान नाही: नायडू

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

तिहेरी तलाकच्या मुद्याचा संबंध समानता आणि महिलांना आत्मप्रतिष्ठेने जगण्याच्या असलेल्या अधिकाराशी आहे. त्याचे राजकारण करण्यात येऊ नये. या प्रकरणी करण्यात येणारे नकारात्मक राजकारण थांबविण्यात यावे

हैदराबाद - "तिहेरी तलाक'च्या प्रथेस मुस्लिम धर्मामधील पुरातन कायदाव्यवस्था असलेल्या "शरिया'मध्ये कोणतेही स्थान नसल्याचे मत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (रविवार) व्यक्त केले. तिहेरी तलाकच्या मुद्याचे राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, नायडू यांनी तलाकसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.

"तिहेरी तलाकच्या मुद्याचा संबंध समानता आणि महिलांना आत्मप्रतिष्ठेने जगण्याच्या असलेल्या अधिकाराशी आहे. त्याचे राजकारण करण्यात येऊ नये. या प्रकरणी करण्यात येणारे नकारात्मक राजकारण थांबविण्यात यावे, असे माझे सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे,'' असे नायडू म्हणाले.

तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण होणार नाही याची काळजी मुस्लिम समुदायाने घ्यावी, असे आवाहन शनिवारी संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त बोलताना मोदी यांनी केले होते. ते म्हणाले, "मुस्लिम समुदायातील सुधारकांनी मुस्लिम समुदायातील महिलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांविरुद्ध (तोंडी तलाक) लढण्यासाठी समोर यावे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा. मी मुस्लिम समुदायाला विनंती करतो की त्यांनी या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये''.

या पार्श्‍वभूमीवर, तिहेरी तलाकला शरियाचा आधार नसल्याची नायडू यांनी मांडलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: Triple Talaq has no sanction in Shariat: Venkaiah Naidu