'तोंडी तलाक'हा मुस्लिम धर्मातील मुलभूत मुद्दा आहे का : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

'तोंडी तलाक'हा मुस्लिम धर्मातील मुलभूत मुद्दा आहे की नाही याचा अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरील सुनावणीदरम्यान दिले आहेत.

नवी दिल्ली : 'तोंडी तलाक'हा मुस्लिम धर्मातील मुलभूत मुद्दा आहे की नाही असा प्रश्न विचारात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हे पहिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

'तोंडी तलाक'च्या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. खंडपीठामध्ये न्यायाधीश कुरियन जोसेफ, न्यायाधीश रोहिंतॉन फली नरीमन, न्यायाधीश उदय उमेश ललित आणि न्यायाधीश एस. अब्दुल नझीर या न्यायाधीशांचा समावेश आहे. 'तोंडी तलाक'ची पद्धत बंद करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम महिलांनी याचिका दाखल केली आहे. काही याचिकांमध्ये मुस्लिम धर्मातील बहुपत्नीत्व पद्धतीसह अन्य काही मुद्यांचाही समावेश होता. मात्र 'तोंडी तलाक'च्या सुनावणीसोबत बहुपत्नीत्वाच्या मुद्याची सुनावणी करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात केवळ 'तोंडी तलाक'ची घटनात्मक वैधता तपासण्यात येईल, असेही न्यायालयाने सांगितले. 'या प्रकरणातील दोन्ही पक्षांना आपली मते मांडण्यासाठी प्रत्येकी दोन दिवस दिले जातील. या दरम्यान दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडावी. मात्र कोणत्याही पक्षाने आपल्या एकाच मुद्याची पुनरावृत्ती करू नये', अशी सूचना न्यायालयाने दिली.

'तोंडी तलाक' घटनाबाह्य - अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल
'तोंडी तलाक'बाबतच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात निकाला दिला आहे. 'तोंडी तलाक'ची पद्धत एकतर्फी आणि कायद्याच्या दृष्टीने चुकीची असल्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

Web Title: Triple Talaq hearing started in supereme court