मोदींनी असं काम केलं जे ट्रम्प यांना करता आलं नाही - जेपी नड्डा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

 बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवारी 7 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्याआधी निवडणूक प्रचार सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

दरभंगा - बिहार निवडणुकीच्या (Bihar election) तिसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवारी 7 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्याआधी निवडणूक प्रचार सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं काम केलं जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनाही करता आलं नाही. ते काम आहे देशाला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचं. 

दरभंगा इथं झालेल्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना नड्डा यांनी भारतातील कोरोनाची परिस्थिती केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीनं हाताळल्याचं म्हटलं आहे. भारतात आतापर्यंत 84 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली तर 1 लाख 24 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या अमेरिकेत निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्याकडून कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यांच्यावर टीका होत असल्याचंही नड्डा यांनी म्हटलं. ट्रम्प यांच्यावर यावरूनही विरोधक बायडेन यांनी प्रचारावेळी सातत्याने टीका केली. 

हे वाचा - US Election - ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या; मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळला

जेपी नड्डा म्हणाले की, अमेरिकेचे निवडणूक निकाल जाहीर होत आहेत. आता ट्रम्प यांच्याविरोधात आरोप केले जात आहेत की त्यांना देशात कोरोनाच्या संकटाकाळातील परिस्थिती नीट हाताळता आली नाही. याचवेळी दुसरीकडे भारतात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मोदींनी 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला वाचवलं असंही नड्डा यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trump cant but modi did and save country from corona says jp nadda