चला, ट्युलिप गार्डन खुणावतेय..! (व्हिडिओ)

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक नजर

  • प्रसिद्ध ट्युलिप गार्डन आता पर्यटकांसाठी खुले
  • दोनच दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी हे गार्डन खुले
  • येत्या दोन ते तीन दिवसात येथे १२ लाखांहून अधिक फुले उमलणार
  • हा अनोखा आविष्कार पुढे २५ दिवस मिळणार अनुभवायला
  • जम्मू-काश्‍मिरमधील पर्यटनात येणार बहर 

श्रीनगर - आशिया खंडातील सर्वात मोठे म्हणून प्रसिद्ध असलेले ट्युलिप गार्डन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दोनच दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात येथे १२ लाखांहून अधिक फुले उमलणार असून हा अनोखा आविष्कार पुढे २५ दिवस अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मिरमधील पर्यटनाला यानिमित्ताने आणखी बहर येणार आहे. 

काय आहे ट्युलिप गार्डन ?
२००८ साली तत्कालीन मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी या उद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यानंतर एकेक टप्पा पार करत आता फुलांची संख्या बारा लाखांवर पोचली आहे. ट्युलिप फुलांचा हंगाम तीन ते चार आठवड्यांचा किंबहुना जास्तीत जास्त पंचवीस दिवसांचा असतो. त्यामुळे एकाचवेळी ही फुले उमलल्यानंतर दिसणारा आविष्कार साऱ्यांनाच मोहवून टाकतो. गेल्या अकरा वर्षात आशिया खंडातील सर्वात मोठे उद्यान अशी या गार्डनची ओळख निर्माण झाली असून यंदा हे गार्डन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वांसाठी खुले असेल. नव्वद एकारहून अधिक जागेत विस्तारलेल्या या गार्डनमध्ये पन्नास ते पंचावन्नहून अधिक प्रजातींच्या फुलांचा समावेश आहे. 

मराठमोळा प्रतिसाद
काश्‍मीरमध्ये पर्यटनाला जायचं की नाही, याबाबतची संभ्रमावस्था यंदाही कायम आहे. गेल्या चार-पाच वर्षांचा इतिहास पहाता जम्मू-काश्‍मिरमध्ये जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात एखादी दुर्घटना घडते आणि त्याचा पुढे एकूणच पर्यटनाच्या हंगामावर परिणाम होतो. मात्र, ज्या ठिकाणी पर्यटक येतात तेथे कधीही दुर्घटना घडली नसल्याचे नागरिक सांगतात. दोनच दिवसापूर्वी २७ मराठी महिलांनी या गार्डनला भेट दिली. नागपूर, मुंबई आणि पुण्यातील या महिलांबरोबर तीन शाळकरी मुलीही होत्या. परदेशात जावून निसर्गाचा आविष्कार अनुभवण्यापेक्षा काश्‍मिरच्या नंदनवनाला आवर्जुन भेट द्या, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.  

काश्‍मीर पाहायला अधिकाधिक भारतीयांनी प्रत्येक वर्षी आले पाहिजे, हे आमचे पहिल्यापासूनचे धोरण राहिले आहे. ‘ट्युलिप गार्डन’च नव्हे तर एकूणच काश्‍मीरच्या पर्यटनात आजवर कुठल्याही पर्यटकाला कसल्याही प्रकारची बाधा पोचलेली नाही. पूर्णपणे सुरक्षित असा हा सारा परिसर आहे.
- अभिजित पाटील,
चेअरमन, राजा-राणी ट्रॅव्हल्स 

काश्‍मीरच्या पर्यटन हंगामात ट्युलिप गार्डनला गेल्या दहा वर्षांत विशेष महत्त्व आले आहे. पर्यटनवाढीसाठी यंदाच्या हंगामातही विविध योजना जाहीर केल्या असून, त्याचा पर्यटकांना लाभ मिळणार आहे. केवळ परदेशीच नव्हे तर भारतीय पर्यटकांनीही मोठ्या संख्येने त्याचा लाभ घ्यायला हवा. 
- निसार अहमद वाणी,
संचालक, काश्‍मीर टुरिझम बोर्ड

Web Title: Tulip garden Srinagar 2019 open for tourist