शत्रुघ्न - मोदींमध्ये रंगले ट्‌विटरयुद्ध

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

सिन्हा हे पाटणा साहेब लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत; पण 2015 मधील बिहार विधानसभा निवडणुकीपासून पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याने ते व्यथित आहेत.

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भाजपच्या भूमिकेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा व सुशीलकुमार मोदी यांचे ट्‌विटरयुद्ध सोमवारी चांगलेच रंगले.

'आपले राजकीय नेते मग ते केजरीवाल, लालू यादव किंवा सुशील मोदी असोत, त्यांच्यावर विरोधकांकडून सुरू असलेली चिखलफेक व गलिच्छ राजकारण आता पुरे झाले,'' असे संदेश सिन्हा यांनी ट्विटरवरून दिला. सुशीलकुमार मोदी यांनी गद्दारांना घरातून हाकलून देण्याची मागणी केली आहे. त्यावर सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली. सिन्हा हे पाटणा साहेब लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत; पण 2015 मधील बिहार विधानसभा निवडणुकीपासून पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याने ते व्यथित आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व 'राजद'चे लालूप्रसाद यांच्याशी सिन्हा यांचे मैत्रीपूर्ण संबंधावरून भाजपने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.

सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद व त्यांच्या कुटुंबीयाला एक हजार कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेवरून सध्या चांगलेच अडचणीत आणले आहे. यावरून शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींवर टीका केली. ''आपला भाजप पक्ष पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर विश्‍वास ठेवतो, जे क्वचित एकत्र दिसते पण एकत्रच असायला हवे.'' असे सिन्हा यांनी म्हटले आहे. यावर मोदी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला.

'बेहिशेबी मालमत्तेवरून ज्या लालू यांचा बचाव करण्यासाठी नितीशकुमार धावून आले नाहीत, त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे 'शत्रू' स्वतः आले,'' असे ते म्हणाले.

Web Title: tweet fight between shatrughan sinha and sushilkumar modi