ट्विटरने डिलिट केलं 'लालू फोन' प्रकरणातील मोदींच्या आरोपाचे ट्विट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना तुरुंगातून फोन करत असल्याचा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला होता.

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कथित फोन कॉलसंदर्भात केलेले ट्विट आता ट्विटरने काढून टाकले आहे. गेल्या मंगळवारी मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप केला होता की, लालू तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही एनडीएच्या आमदारांना फोन करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या आरोपामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली होती. मोदी यांनी हा आरोप करताना एक ऑडीओ रेकॉर्डींग देखील ट्विट केलं होतं. ज्यात लालू प्रसाद यादव मंत्रीपदाचे आश्वासन देऊन भाजपच्या एका आमदाराला फूस लावत असल्याचं ऐकू येत आहे.

ट्विटरने का काढलं ट्विट?
सुशीलकुमार मोदी यांनी हा आरोप करताना ज्या नंबरवरुन हा कॉल केला गेला होता त्या मोबाईल नंबरचाही उल्लेख केला होता. या नंबरवरुन लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना फोन करत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप होता. मात्र, ट्विटमध्ये याप्रकारे मोबाईल नंबर देणं हे ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग असल्याचे कारण देत ट्विटरने हे ट्विट काढून टाकलं आहे. 

हेही वाचा - जेलमधून लालूंची खरंच फोनाफोनी सुरुय का? जेलरनी दिले चौकशीचे आदेश

प्रकरणाची चौकशीचे दिले आदेश
या आरोपावर आता झारखंडचे तुरुंग महानिरीक्षक विरेंद्र भूषण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भूषण यांनी सांगितलं की, या प्रकरणात त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिक्षक यांना तपासाचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटलंय की, प्रकरणाच्या तपासाचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. भूषण यांनी म्हटलं की, अटक असताना फोन अथवा मोबाईलचा वापर करणे अवैध आहे. तपासात जर ही बाब सिद्ध झाली तर पहिल्यांदा हे शोधलं जाईल की हा मोबाईल लालू प्रसाद यादव यांच्याकडे पोहोचला कसा आणि यासाठी कोण दोषी आहेत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter India removed sushil kumar modi tweet accusing lalu prasad yadav