आता दोन दिवस "उधार'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 डिसेंबर 2016

रोकड टंचाईचा खरेदीला फटका

रोकड टंचाईचा खरेदीला फटका

मुंबई : नोटाबंदीची मोहीम अंतिम टप्प्यात आली असतानाच महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवार यामुळे दोन दिवस बॅंकिंग यंत्रणा बंद राहणार आहे. यामुळे जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांना सोमवारची (ता.26) वाट पाहावी लागेल. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात दोन दिवस भरच पडण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे राज्यासह देशभरात नोटाजप्तीचे व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कारवाईचे सत्र सुरू आहे. त्यात आज नाशिक व पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली. या रोकड टंचाईचा फटका सर्व प्रकारच्या व्यापाराला फटका बसत असल्याचे चित्र आहे.

नोटाबंदी 8 नोव्हेंबरपासून लागू झाल्यापासून बॅंकिंग यंत्रणेत तब्बल 13 लाख कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. विविध तपास यंत्रणांनी देशभरात छापे घालून चारशेहून अधिक कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. नोटाबंदीला 30 डिसेंबरला 50 दिवस पूर्ण होत असून, नागरिकांसाठी जुन्या नोटा जमा करण्यासाठी शेवटचा आठवडा आहे. चौथा शनिवार आल्याने सर्वच बॅंकांचे कामकाज बंद राहील. यामुळे नागरिकांना दोन दिवस बॅंकांचे व्यवहार करता येणार नाहीत. तसेच, रविवारी नाताळ सण असून, रोकड टंचाईचा खरेदीला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

एटीएममध्ये रोकड मिळेल का?
एटीएम सेवा अद्याप पूर्ववत झालेली नसून, एटीएम यंत्रांमधील खडखडाट कायम आहे. बॅंकांकडून एटीएममध्ये पैसे भरण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सलग दोन दिवस आलेली सुटी लक्षात घेऊन बॅंकांनी एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड ठेवावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

खासगी बॅंका संशयाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली : नोटाबंदीमध्ये बॅंक अधिकाऱ्यांकडून कमिशन घेऊन मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा बदली केल्या जात आहेत. त्याचबरोबर कोट्यवधींच्या व्यवहारांसाठी बनावट खात्यांचा वापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. ऍक्‍सिस बॅंकेपाठोपाठ कोटक बॅंकेमध्येही बनावट खात्यांमध्ये कोट्यवधींचे घबाड मिळाल्याने खासगी बॅंका संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

ऍक्‍सिस बॅंकेतील काही संशयास्पद खात्यांचा कोटकमधील खात्यांशी संबंध असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग शाखेत छापा घालण्यात आला. बॅंकेतील राधिका जेम्स कंपनीच्या खात्यातून 36 कोटी 40 लाख जमा करण्यात आले. पुढे ते ऍक्‍सिस बॅंकेतील एनसी ज्वेलर्सच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यात आले. या व्यवहाराची चौकशी केली असता, एनसी ज्वेलर्सचे खाते बनावट असल्याचे समोर आले आहे.

त्याचबरोबर बनावट कंपन्यांच्या नावे आठ बनावट खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनात आले आहेत. यात 32 कोटी 25 लाखांचे व्यवहार झाले. राजकुमार आणि रमेश चांद या दोन व्यक्तींनी या आठ बनावट खात्यांमधून व्यवहार केल्याचे प्राप्तिकर खात्याने म्हटले आहे. ऍक्‍सिस आणि कोटक बॅंकांतील बनावट खात्यांमुळे खासगी बॅंकांच्या व्यवहारांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, बॅंकेकडून "केवायसी' नियमांचे पालन केले जाते. प्राप्तिकर विभागाच्या तपासाला सहकार्य केले जाईल, असे कोटक बॅंकेने म्हटले आहे.

Web Title: For two days now, "borrowed"