पुलवामा'च्या सूत्रधाराच्या संपर्कात होतो; अटकेतील काश्‍मिरी युवकांची कबुली

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी याच्याशी संपर्कात होतो, अशी कबुली उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने देवबंद येथून अटक केलेल्या दोन काश्‍मिरी युवकांनी दिली आहे. जैशे महंमदशी संबंध असल्याचा आणि दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. 

लखनौ : पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी याच्याशी संपर्कात होतो, अशी कबुली उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने देवबंद येथून अटक केलेल्या दोन काश्‍मिरी युवकांनी दिली आहे. जैशे महंमदशी संबंध असल्याचा आणि दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. 

दहशतवादविरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी सहारणपूर जिल्ह्यातील देवबंद येथून शहनवाज तेली आणि अब्दुल अकीब मलिक या दोघा काश्‍मिरी युवकांना अटक केली होती. हे दोघे विद्यार्थी असल्याचा बहाणा करून येथे युवकांची दिशाभूल करून त्यांना जैशे महंमदमध्ये भरती करण्यासाठी आले असल्याचा पोलिसांचा आरोप होता. या युवकांच्या आजच्या कबुलीने तो बरोबर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला गाझी हा नंतर चकमकीत मारला गेला. मात्र, हल्ल्यापूर्वी आपण त्याच्या संपर्कात होतो, असे या दोघांनी पोलिसांसमोर कबूल केल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोघांपैकी एकाच्या मोबाईल फोनमधून "बडा काम' आणि "सामान' याबद्दल तो बोलत असल्याचा ऑडिओ संदेशही आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी त्यांची चौकशी केली. पुलवामा हल्ला घडवून आणलेल्या जैशे महंमदशी संबंध असल्याचे दोघांनी मान्य केले आहे. शहनवाज हा दीड ते दोन वर्षांपासून "जैश'च्या संपर्कात होता, तर अकीब हा सहा महिन्यांपासून त्यांच्यासाठी काम करीत होता. या दोघांशी "जैश'च्या म्होरक्‍यांनी संपर्क साधला होता आणि त्यांच्याच चिथावणीवरून संघटनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क साधताना सांकेतिक भाषेचा वापर केला जातो, असे सांगत दोघांनी त्याबाबत माहिती पोलिसांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Member From Jaish e Mohammed Confessed About Their relation