अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत दोन दहशतवादी ठार 

पीटीआय
गुरुवार, 26 जुलै 2018

श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनागच्या लाल चौक परिसरात असलेल्या घरावर मंगळवारी मध्यरात्रीपासून कारवाई सुरू होती. जवानांना मंगळवारी रात्री लाल चौक परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या आधारावर राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्‍मीर पोलिसचे एसओजी आणि केंद्रीय राखीव दलाच्या 162 व्या तुकडीच्या जवानांनी मोठी तपास मोहीम उघडली. परिसरातील वाढता तणाव लक्षात घेता इंटरनेटसेवादेखील बंद करण्यात आली. 

चारही बाजूंनी नाकाबंदी करत लाल चौक परिसरातील घरांची झडती सुरू केली. तपासणी मोहिमेदरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी पहाटे चारच्या सुमारास अचानक जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीदेखील संशयित घराला चारही बाजूंनी घेरले आणि दोन्हीकडून गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार सहा तास सुरू होता. त्यात दोन दहशतवादी मारले गेले. घटनास्थळावरून शस्त्रसाठा आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. जवानांनी दहशतवाद्यांनी ज्या घराचा आश्रय घेतला होता, ते घरही उडवून दिले. या कारवाईनंतर जवानांनी परिसरात पुन्हा शोधमोहीम हाती घेतली.

दरम्यान, श्रीनगरमध्ये मंगळवारी एका दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एका जवान हुतात्मा झाला. श्रीनगरच्या बटमालू परिसरात गस्त घालणाऱ्या दलावर अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असता त्याचे निधन झाले. 

Web Title: Two militants killed in Anantnag district encounter