काँग्रेसला धक्का; आणखी दोन आमदारांनी सोडला 'हात'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

- कुमारस्वामी सरकार होणार अस्थिर.

- आमदार के. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांनी दिला राजीनामा.

मुंबई/ बंगळूर : कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई पोलिसांनी शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा, नसीम खान यांना ताब्यात घेतले होते. आठ बंडखोर आमदारांनी आज कर्नाटक सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले, तर कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिल्याने आघाडीच्या सिंहासनाला पुन्हा धक्का बसला आहे. 

कॉंग्रेसचे आमदार के. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांनी आज राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनीही आपण तत्काळ हे राजीनामे स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये बंडाचा झेंडा रोवून मुंबईत डेरेदाखल झालेल्या आघाडीच्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार हे मुंबईत आले होते. आज त्यांनी ज्या हॉटेलामध्ये बंडखोर आमदारांचे वास्तव्य आहे तेथे आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा, नसीम खान आदी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, पुढे त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी शिवकुमार यांना बळजबरीने मुंबई सोडायला भाग पाडल्याचे समजते. या सर्व बंडखोर आमदारांनी आमच्या जिवाला धोका असल्याचे पत्र पोलिस आयुक्तांना दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two MLA Left Congress Party in Karnataka