रेल्वेत जागेच्या वादातून चक्क न्यायाधीशांनाच मारहाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

गया येथून रेल्वे सुटल्यानंतर कुमार झा यांच्याजवळ शशांक गेला होता. त्याने कुमार झा यांना जागेवरुन उठण्यास सांगितले होते. मात्र, कुमार झा यांनी जागेवरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर शशांकने कुमार झा यांची कॉलर पकडून त्यांना जागेवरून उठवले.

पटना : रेल्वेत प्रवाशांमध्ये जागेवरून बऱ्याचदा वाद निर्माण होत असतात. या वादाचे पर्यावसन अनेकदा हाणामारीतही होत असते. ही मारहाण अनेकदा सर्वसामान्य प्रवाशांमध्येच होत असते. मात्र, बिहारमध्ये रेल्वेच्या जागेवरून चक्क न्यायाधीशांनाच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. न्यायाधीशांना मारहाण करण्यात आल्याने या घटनेमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

Rail

44 वर्षीय प्रशांत कुमार झा हे बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुपरी उपविभागात अतिरिक्त मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. कुमार झा हे 16 एप्रिलला गया-पटना पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करत होते. त्यादरम्यान जागेच्या वादावरून दोघांनी न्यायाधीश कुमार झा यांना मारहाण केली. याबाबत जहानबादच्या अधिकारी शकुंतला किस्कू यांनी सांगितले, की याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली. यातील दोघांची ओळख पटली असून, शशांक शेखर देव (28) आणि त्याचा भाचा सूरज कुमार यश देव (19) यांचा समावेश आहे. रेल्वेतील सहप्रवाशांनी केलेल्या व्हिडिओच्या आधारे जहानाबादच्या ब्रम्हर्षि नगरगावच्या दोघांना अटक करण्यात आली. 

गया येथून रेल्वे सुटल्यानंतर कुमार झा यांच्याजवळ शशांक गेला होता. त्याने कुमार झा यांना जागेवरुन उठण्यास सांगितले होते. मात्र, कुमार झा यांनी जागेवरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. शशांकने कुमार झा यांची कॉलर पकडून त्यांना जागेवरून उठवले. त्यानंतर दोघांमधील वाद संपला असताना शशांकने मुखंडपूर येथे त्याच्या काही साथीदारांना बोलावून कुमार झा यांना पुन्हा मारहाण केली. 

Web Title: Two People Arrest For Beating Judge Prashant Kumar Jha Inside Train In Jehanabad Crime News