गांधीजींच्या छायाचित्राविना दोन हजारांच्या नोटा

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

बॅंक व पोलिसांच्या सूत्रांनुसार अशा अनेक नोटा या भागात चलनात आहेत. या नोटांची छपाई मध्य प्रदेशमधील देवास येथील "बॅंक नोट प्रेस'मध्ये झाली असल्याचे सांगण्यात आले.

भोपाळ - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने होत आले आहेत. यानंतर देशात निर्माण झालेली नोटाटंचाईच्या परिस्थितीत सुधारणा होत असली तरी नवे प्रश्‍न अजूनही निर्माण होत आहेत. मध्य प्रदेशमध्ये एका शेतकऱ्याला दोन हजारांच्या नव्या नोटा मिळाल्या; पण त्यावर गांधीजींचे छायाचित्रच नव्हते. या नोटा नकली नाही तर केवळ छपाईतील दोषामुळे असे घडले असल्याचे सांगण्यात आले.

मध्य प्रदेशमधील बिच्छूगावडी (ता. शिवोपूर) या खेड्यात राहणाऱ्या लक्ष्मण मीना या शेतकऱ्याने स्टेट बॅंकेच्या बडोदा शाखेतून मंगळवारी (ता. 3) पैसे काढले. ते म्हणाले, ""बॅंकेतून दोन हजारच्या नव्या तीन नोटा मिळाल्या; पण त्यावर गांधीजींचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे त्या नकली असाव्यात असे वाटल्याने मी पुन्हा बॅंकेत गेलो. बॅंकेच्या व्यवस्थापकांना त्या दाखविल्या. त्यांनी नोटा बॅंकेत भरण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी याची शहानिशा केली आणि नोटा खऱ्या असल्याचे सांगितले. छपाईतील दोषामुळे ही विसंगती निर्माण झाल्याचे कारण त्यांनी दिले.'' बॅंकेने मीना यांना बुधवारी (ता. 4) नोटा बदलून दिल्या. या नोटांविषयी जिल्ह्यातील बॅंकेच्या मुख्य व्यवस्थापकांना कळविण्यात आले असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकाने नकार दिला.

देशात एका वर्षात जेवढी नोटाछपाई होते, तेवढी पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान चलार्थपत्र मुद्रणालयांपुढे आहे. नाशिक, म्हैसूर, सालबोनी व देवास येथील चलार्थ मुद्रणालयांमध्ये नव्या नोटांची छपाई सध्या आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरू आहे. तांत्रिक दोषामुळे नोटा परत येण्याचे प्रमाण नाशिक व देवास येथील केंद्रात 15 टक्के असून, म्हैसूर व सालबोनी येथे एक टक्‍क्‍यापेक्षा कमी आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: two thousand rupee note without gandhi