जेडीयू सरकारचाही पाठिंबा भाजपने काढावा : चौधरी

पीटीआय
शुक्रवार, 22 जून 2018

जम्मू-काश्‍मीरप्रमाणेच बिहारमध्येही भाजपने जेडीयू सरकारचा पाठिंबा काढावा, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे नेते उदय नारायण चौधरी यांनी केली आहे. बिहारमध्ये आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रपती राजवटीखाली होईल, असाही दावा चौधरी यांनी केला. 

पाटणा : जम्मू-काश्‍मीरप्रमाणेच बिहारमध्येही भाजपने जेडीयू सरकारचा पाठिंबा काढावा, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे नेते उदय नारायण चौधरी यांनी केली आहे. बिहारमध्ये आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रपती राजवटीखाली होईल, असाही दावा चौधरी यांनी केला. 

पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले, की जम्मू- काश्‍मीरमधील वाढत्या दहशतवादाच्या कारणावरून भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला. बिहारमध्येही बलात्कार, अत्याचार आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भाजपने नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी. मेहबूबा मुफ्तीच्या सरकारमध्ये भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्र्यांचा समावेश होता.

सुमारे तीन वर्षे हे आघाडी सरकार सत्तेत होते. परंतु या सरकारच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था सुधारणा झाली नाही. उलट निमलष्करी दलाच्या जवानांसह अडीच हजार नागरिक 1200 दिवसांत मारले गेले. परंतु हे अपयश भाजप आता पीडीपीवर फोडत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाबद्दल बोलताना ते म्हणाले, की भाजप नेतृत्व अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून युवकांच्या मूळ प्रश्‍नांना बगल देण्याचा प्रयत्न करत आहे. 
 

Web Title: uday narayan chaudhary statement today on jdu and bjp alliance