"जर्नल'च्या बाजाराला "यूजीसी'चा दणका 

ugc
ugc

नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे धंदेवाईक जर्नलमध्ये संशोधन छापून त्यातून लाभ लाटणाऱ्यांना लगाम लागणार आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून आयोगामध्ये जर्नलची गुणवत्ता तपासण्याचे काम सुरू होते. या दरम्यान तीन हजार 830 जर्नलची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यातील केवळ 531 जर्नल पात्र ठरविण्यात आले. याशिवाय विविध संशोधन परिषदांनी शिफारस केलेले 47 आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गुणवत्ता छाननी कक्षाने शिफारस केलेले 247 असे 825 जर्नल दर्जेदार ठरविण्यात आले आहेत. 

जर्नलबाबत हा निर्णय करताना, चुकीच्या, बोगस, धंदेवाईक जर्नलच्या संपादक मंडळावर सदस्य म्हणून वा संपादक म्हणून काम करू नये, असे आवाहन यूजीसीने प्राध्यापकांना केले आहे. तसेच प्राध्यापकांची निवड करताना त्यांच्या संशोधनाचा आणि जर्नलची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. 

एखाद्याने बोगस जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित करून शैक्षणिक लाभ मिळविले असतील वा सेवेत प्रवेश केला असेल, तर त्याच्या अडचणीदेखील वाढणार आहेत. त्याच्या संशोधनाचा दर्जा वा जर्नलची गुणवत्ता सेवेतील कोणत्याही टप्प्यावर तपासली जाऊ शकते. जर्नल बाद ठरविण्याबाबत आयोगाने आजच देशातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना कळविले आहे. वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस या संकेतस्थळांवरील 40 हजार जर्नलला आयोगाने पात्र ठरविली आहेत.

गुणवत्ता वाढीला लाभ 
याबाबत यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन "सकाळ'शी बोलताना म्हणाले, "गेल्या काही वर्षांत बोगस आणि धंदेवाईक जर्नलचे पेव फुटले होते. अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक त्यास बळी पडत होते. हे प्रकार आता थांबतील. तसेच शिक्षण आणि संशोधनातील नीतीमत्तेबद्दल जागरूकता निर्माण होऊन गुणवत्ता वाढीला या निर्णयाचा फायदा होईल.'' 

देशांतील विद्यापीठांमध्ये गेल्या दहा वर्षांत पीएचडी करताना सादर झालेल्या शोधनिबंधांचा गुणवत्तेच्या दृष्टीने तौलनिक अभ्यास होणार आहे. त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. या अभ्यासासाठी आयआयटी, आयआयएम, अनेक विद्यापीठे, संशोधन संस्थांनी तयारी दाखविली आहे. हे कामही लवकरच सुरू होईल. 
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com