दुधाळ जनावरांसाठीही आता यूआयडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - प्रत्येक नागरिकासाठी विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच यूआयडी क्रमांक देण्याच्या धर्तीवर आता दुधाळ जनावरांसाठीही यूआयडी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कृषी खात्याच्या पशुधन संजीवनी योजनेतून हे यूआयडी दिले जातील. कर्ज योजनेतून घेतलेल्या जनावरांना ज्याप्रमाणे कानावर पितळी बिल्ला लावला असतो, तशा प्रकारचे दुधाळ जनावरांना हे ओळख क्रमांक लावले जातील.

कृषी मंत्रालयाच्या वार्षिक कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी या प्रस्तावित पशुधन संजीवनी योजनेची माहिती दिली. दुधाळ जनावरे रोगमुक्त ठेवणे आणि दुग्धोत्पादन वाढविणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक जनावराचा तपशील हाताशी असावा आणि त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून सुमारे साडेआठ कोटी पशूंची माहिती यातून संग्रहीत केली जाईल.

प्रत्येक दुधाळ जनावरासाठी हेल्थ कार्ड (आरोग्यविषयक तपशिलांच्या नोंदी असलेले कार्ड) दिले जाईल. त्यामध्ये जनावराची जात, वय, लसीकरण, आहार यांसारख्या नोंदी असतील. ही संपूर्ण माहिती राष्ट्रीय पातळीवरील डाटाबेसमध्ये जमा केली जाईल. साहजिकच यातून पशुधनाची काळजी घेणे, धवलक्रांतीचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यात अडचण येणार नसल्याचा दावाही कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी या वेळी केला.

कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशभरातील सर्व दुधाळ जनावरांच्या नोंदी घेऊन त्यांना यूआयडी देण्याची प्रक्रिया आगामी दोन वर्षांत (2019 पर्यंत) पूर्ण होणे अपेक्षित आहे. जगभरात प्रगत देशांमध्ये डेअरी व्यवसायासाठी उपयुक्त जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्याची पद्धत प्रचलित असल्याने भारतातही त्याचा अवलंब केला जावा, अशी मागणी होती. या पाहणीतून उपलब्ध होणारी आकडेवारी, जनावरे खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांसाठीही लाभदायक ठरेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

Web Title: UID for animals