ममतांच्या इशाऱ्यानंतर आठ डॉक्‍टरांचे राजीनामे

ममतांच्या इशाऱ्यानंतर आठ डॉक्‍टरांचे राजीनामे

कोलकता ः "कामावर रुजू व्हा, अथवा कारवाईला तयार व्हा,' असा निर्वाणीचा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपावरील डॉक्‍टरांना गुरुवारी दिला. मात्र, या इशाऱ्यानंतरही डॉक्‍टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला. उलट मुख्यमंत्री आम्हाला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसने संपाला भाजप व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरले आहे.

कोलकत्यामधील "एसएसकेएम' या सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्‍टर मंगळवारपासून (ता. 11) संपावर आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरला मारहाण केली. सहकाऱ्याला झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्‍टरांनी संप केला आहे. या संपात कनिष्ठ डॉक्‍टरांबरोबरच वरिष्ठ डॉक्‍टर सहभागी झाले आहेत. बुधवारी (ता. 12) सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत रुग्णालयातील कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला होता. गुरुवारीही तिसऱ्या दिवशी आरोग्यसेवा पूर्ववत होऊ शकली नाही. 

या पार्श्‍वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आज दुपारी बाराच्या दरम्यान "एसएसकेएम'ला भेट दिली. त्या वेळी त्यांना डॉक्‍टरांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. "आम्हाला न्याय हवा आहे,' अशा घोषणा डॉक्‍टरांनी दिल्या. डॉक्‍टरांच्या अशा वर्तनाने संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांनी त्यांना चार तासांच्या आत कामावर रुजू होण्याचा इशारा दिला. ""प्रत्येक डॉक्‍टरला विद्यावेतन म्हणून राज्य सरकारकडून 25 लाख रुपये दिले जातात. तरीही तुम्ही कामापासून पळ काढत आहात. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. जे डॉक्‍टर काम सुरू करणार नाहीत, त्यांनी वसतिगृह सोडावे,'' असा इशारा त्यांनी दिला. तसेच, रुग्णालयाचा परिसर रिकामा करावा. रुग्णांशिवाय कोणालाही तेथे थांबण्याची परवानगी देऊ नये, असा आदेश बॅनर्जी यांनी पोलिसांना दिला. 

"भाजप व माकपचे कारस्थान' 
कनिष्ठ डॉक्‍टरांचा हा संप म्हणजे भाजप आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कारस्थान असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. बाहेरचे लोक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येऊन गोंधळ माजवितात, असे सांगत या संपाला भाजप जातीयवादी रंग देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बॅनर्जी म्हणाल्या, की "माकप'च्या मदतीने भाजप हिंदू-मुस्लिम राजकारण करीत आहेत. त्यांचे प्रेमप्रकरण पाहून मला धक्काच बसला. राज्यात जातीय तणाव वाढविण्यासाठी व फेसबुकवर त्याचा प्रचार करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांच्याकडे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कार्यभारही आहे. 

विशिष्ट समाजाच्या सदस्यांनी डॉक्‍टरांवर हल्ला केला असून, हे हल्लेखोर तृणमूल कॉंग्रेसचे आहेत.-मुकुल रॉय, भाजप नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com