भारतातील बेरोजगारीचा उच्चांक

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

भारतातील बेरोजगारीचा दर ऑक्‍टोबर महिन्यात ८.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तीन वर्षांतील बेरोजगारीचा हा उच्चांक आहे.

नवी दिल्ली - भारतातील बेरोजगारीचा दर ऑक्‍टोबर महिन्यात ८.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तीन वर्षांतील बेरोजगारीचा हा उच्चांक आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेने नुकतीच बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. 

ऑगस्टनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्‍क्‍यांवर गेले आहे. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ७.२ टक्के होता. देशातील उद्योगांना मंदीने ग्रासले आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांची मागणी वाढविण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. मात्र वाढत्या बेरोजगारीने सरकारपुढे नवे संकट उभे राहिले आहे. यापूर्वीही बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवार धरले होते. आता पुन्हा एकदा बेरोजगारीचा दर वाढल्याने सरकारसमोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ७.९ टक्के असणारा बेरोजगारी दर दुसऱ्या आठवड्यात ८.१ टक्के; तर तिसऱ्या आठवड्यात ८.४ टक्के असा वाढत गेला आहे.

औद्योगिक उत्पादनाला फटका
मंदीचा प्रभाव आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी रोडावल्याने सप्टेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादनाला फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात आठ प्रमुख क्षेत्रांच्या एकूण उत्पादनात ५.२ टक्‍क्‍यांची घसरण नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात आठ क्षेत्रांच्या उत्पादनात ४.३ टक्‍क्‍यांची वाढ झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment in October rises to 8.5 percent