केंद्र सरकार दलितविरोधी ; काँग्रेस, बसपचा आरोप

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पुन्हा राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सभापती वेंकय्या नायडू यांनी आज दिली. जेटली यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ काल (ता.2) समाप्त झाला होता. जेटली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. मात्र, आज पार पडलेल्या शपथविधी समारंभास ते अनुपस्थित होते. 

नवी दिल्ली : राज्यसभेवर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी संपन्न होताच कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कॉंग्रेस व बहुजन समाजवादी पक्षाने केंद्र सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप केला. 

कॉंग्रेससह, तृणमूल, समाजवादी पक्ष, बसप, टीडीपी तसेच, अण्णा द्रमुक, द्रमुक विरोधी पक्षांतील सदस्यांनी कामकाजाला प्रारंभ होताच सभापतींच्या आसनासमोर एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती वेंकय्या नायडू यांनी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट करूनही हा गोंधळ सुरू राहिला. परिणामी नायडू यांना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. 

बॅंकांतील गैरव्यवहार, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, कावेरी वाद तसेच दलितांवरील अत्याचार या मुद्द्यांवरून विविध पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे 5 मार्चपासून सभागृहात ठोस कामकाज होऊ शकलेले नाही. 

सभागृह नेतेपदी पुन्हा जेटली 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पुन्हा राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सभापती वेंकय्या नायडू यांनी आज दिली. जेटली यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ काल (ता.2) समाप्त झाला होता. जेटली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. मात्र, आज पार पडलेल्या शपथविधी समारंभास ते अनुपस्थित होते. 

41 जणांनी घेतली शपथ 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, जगत प्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध राज्यांतून राज्यसभेवर निवडून आलेल्या 58 सदस्यांपैकी 41 जणांनी आज शपथ घेतली. थावरचंद गेहलोत यांनी संस्कृतमधून सदस्यपदाची शपथ घेतली, तर भाजपचे सरोज पांडे यांचा पाय फ्रॅक्‍चर असल्याने त्यांनी जागेवरूनच शपथ घेतली.  

Web Title: Union Government is Against Dalit Congress BSP allegations