
फक्त दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोविड-19 ची लस मोफत दिली जाणार आहे, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही वेळापूर्वी केलं होतं.
नवी दिल्ली : फक्त दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोविड-19 ची लस मोफत दिली जाणार आहे, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही वेळापूर्वी केलं होतं. मात्र, आता त्यांनी आपल्या या वक्तव्यावरुन 'यू टर्न' घेतला आहे. आता त्यांनी या वक्तव्याबाबत ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोना लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मोफत लस ही आत्यंतिक गरज असणाऱ्या 1 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी लस दिली जाईल. त्यासोबतच दोन कोटी फ्रंटलाईन वर्कर्सना देखील ही लस दिली जाणार आहे. थोडक्यात, सगळ्या देशासाठी ही लस मोफत असणार नाही, हे स्पष्ट केलं गेलं आहे.
In 1st phase of #COVID19 vaccination, free vaccine shall be provided across the nation to most prioritised beneficiaries that incl 1 cr healthcare & 2 cr frontline workers, tweets Union Health Minister Dr Harsh Vardhan https://t.co/KYKHW5SAzz
— ANI (@ANI) January 2, 2021
गेल्या एका वर्षापासून जगावर मोठे संकट बनून उभे ठाकलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या जगभरात लशीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इस्त्रायल अशा युरोपियन देशांमध्ये लशीकरणास सुरवात करण्यात आली आहे. भारतात देखील ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली असून आज देशात 'ड्राय रन' अर्थात सराव फेरी घेण्यात येत आहे. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना कोरोना लशीकरणाबाबत विचारले असता त्यांनी मोठी माहिती दिली होती.
#WATCH | Not just in Delhi, it will be free across the country: Union Health Minister Dr Harsh Vardhan on being asked if COVID-19 vaccine will be provided free of cost pic.twitter.com/xuN7gmiF8S
— ANI (@ANI) January 2, 2021
त्यांनी म्हटलं होतं की, फक्त दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोविड-19 ची लस मोफत दिली जाणार आहे. मात्र, आता त्यांनी या वक्तव्यावरुन घुमजाव केला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आज सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.
भारतात कोरोना लस मिळण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सीरमच्या कोविशिल्ड लशीच्या वापरासाठी ना हरकत प्रमाणपत्र तज्ज्ञांच्या समितीने दिलं आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबतची शिफारस तज्ज्ञांनी डीजीसीआयकडे केली आहे. कोविशिल्डच्या वापराला काही अटींसह वापर करण्यासाठी परवानगी देता येईल असं समितीने म्हटलं आहे.
हेही वाचा - Covid 19 Vaccine - सीरमच्या लशीला तज्ज्ञांचा हिरवा कंदील; परवानगीसाठी DGCI कडे शिफारस
गेल्या 24 तासांत भारतात 19,078 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह भारतात आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,03,05,788 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह भारतातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,49,218 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात एकूण 2,50,183 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 22,926 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 99,06,387 वर जाऊन पोहोचली आहे. काल एका दिवसात 8,29,964 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 17,39,41,658 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे.