
Corona Returns : कोरोना वाढतोय; 24 तासांमध्ये देशात 'एवढे' रुग्ण आढळले
नवी दिल्लीः देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. तब्बल चार महिन्यांनंतर आकडेवारी वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी आकडेवारी अपडेट केली. त्यानंतर कोरोनाचं संकट पुन्हा घोंघावत असल्याचं दिसून येतंय.
भारतात १२९ दिवसांनंतर एका दिवसात १ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. देशात एकूण कोरोनाचे सक्रीय रुग्ण ५ हजार ९१५ झाले आहेत. तर मागच्या २४ तासांमध्ये १ हजार ७१ रुग्ण बाधित झाले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे २४ तासांमध्ये देशात कोरोनामुळे तीन जणांना बळी गेलाय. आतापर्यंच्या मृत्यूचा आकडा ५ लाख ३० हजार ८०२ इतका झाला आहे. मृतांमध्ये राजस्थान, महराष्ट्र आणि केरळमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने आज सकाळी कोरोनाचे आकडे अपडेट करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या ४.४६ कोटी इतकी आहे. एकूण रुग्णांपैकी ०.०१ टक्के रुग्ण सक्रिय आहेत. तर राष्ट्रीय COVID-19 रिकव्हरी दर ९८.८ टक्के आहे.
कोरोना रुग्ण वाढत असले तरी रिकव्हर झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी ४१ लाख ५८ हजार ७०३ इतकी आहे. तर मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळावर राष्ट्रव्यापी कोरोना लसीकरण अभियानाच्या माध्यमातून देशात आतापर्यंत २२०.६५ कोटी लसी देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
अभ्यासकांच्या मते मागच्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड-१९ XBB व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट XBB 1.16 असू शकतो. व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असलेल्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने शुक्रवारच्या आकड्यांनुसार भारतात XBB 1.16 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं नमूद केलं आहे. रिपोर्टनुसार भारतात ४८, सिंगापूरमध्ये १४ आणि अमेरिकेत १५ केसेस XBB 1.16 व्हेरिएंटच्या केसेस आढळून आलेल्या आहेत.