
Rahul Gandhi : "चोर तर चोर वर शिरजोर..."; भाजप नेत्याची राहुल गांधींवर जहरी टीका
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपच्या निशाण्यावर आहेत. भाजप अजुनही राहुल गांधींच्या माफीनाम्यावर ठाम आहे. तर काँग्रेसने स्पष्ट केलं की, राहुल गांधी यांनी असं कोणतही विधान केलं नाही, की ज्यामुळे माफी मागावी. यावरून भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांनी परदेशातून भारतावर वारंवार हल्लाबोल करणे, खोटे बोलणे, देशाची बदनामी करून माफीही न मागणे हे 'चोर तर चोर पुन्हा शिरजोर, असंच आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित चालावे, अशी आमची इच्छा आहे, पण राहुल गांधी यांनी माफी मागावी, असं ठाकूर म्हणाले.
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष लडाख आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही का? त्यावर राहुल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुल म्हणतात, लोकशाही संपत चालली आहे. खरे तर भारतातून कॉंग्रेस पक्ष संपून चालला आहे. संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, असे राहुल यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली होती, पण ते तयारी न करता बोलतात, असंही ठाकूर यांनी नमूद केलं.
राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात म्हणाले होते की, जेव्हा काँग्रेसचे खासदारांची बोलण्याची वेळ येते, तेव्हा संसदेतील माइक बंद केले जातात. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. भारतातील लोकशाहीवर थेट हल्ला होत आहे. याच विधानांवर अनुराग ठाकूर यांनी टीका केली आहे.