बुखारींच्या हत्येमध्ये "आयएसआय'चा हात केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांचा दावा

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

जम्मू-काश्‍मीरमध्ये वरिष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत पाकिस्तानची गुप्तचर संस्था "आयएसआय'चा हात असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी, खोऱ्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याची ही पहिलीच घटना नसल्याचे नमूद केले. 
 

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमध्ये वरिष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत पाकिस्तानची गुप्तचर संस्था "आयएसआय'चा हात असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी, खोऱ्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याची ही पहिलीच घटना नसल्याचे नमूद केले. 

एका दूरचित्र वाहिनीशी बोलताना सिंह म्हणाले, की बुखारी यांची हत्या स्पष्टपणे दहशतवाद्यांचे कृत्य आहे आणि पाकिस्तानची आयएसआय त्यांची मार्गदर्शक आहे. बिहारमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेले सिंह हे माजी प्रशासकीय अधिकारी असून, काही काळ त्यांनी केंद्रीय गृह सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. ज्या-ज्या वेळी योग्य आवाज उठविला गेला आहे, तेव्हा दहशतवाद्यांनी तो शांत केला आहे. ही काही छोटी घटना नाही, असेही त्यांनी नमूद केले. दहशतवाद्यांनी आता मुस्लिम समुदायालाच लक्ष्य केले असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याचेही सिंह म्हणाले. 

खोऱ्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक रायझिंग काश्‍मीर या इंग्रजी वृत्तपत्राचे मुख्य संपादक शुजात बुखारी यांची काल (गुरुवारी) हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यामध्ये आणखी दोघांचाही मृत्यू झाला आहे. गुप्तचरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्करे तैयबाचा हात आहे. 

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केले, तर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही बुखारी यांच्या हत्येचा कठोर शब्दांत निषेध केला. एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बुखारी यांच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. 

जम्मू-काश्‍मीरमधील सुरक्षेच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी लष्कराला मोकळीक दिली पाहिजे. दहशतवाद्यांना केवळ बंदुकीची भाषा समजते. चर्चेची तयारी दाखविल्यास ते तुम्हाला कमजोर समजतात. राज्यातील मेहबूबा मुफ्ती सरकार बरखास्त करणे ही काळाची गरज आहे. 
- डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, भाजपचे ज्येष्ठ नेते 

रायझिंग काश्‍मीरची बुखारींना श्रद्धांजली 
बुखारी यांच्या हत्येनंतरही रायझिंग काश्‍मीरने त्यांचा दैनिक अंक आज बाजारात आणला. दैनिकाच्या पहिल्या पानावर संपूर्ण पानभर काळ्या रंगाच्या पार्श्‍वभूमीवर दिवंगत मुख्य संपादकांचे छायाचित्र आहे. वृत्तपत्राचा आवाज दडपला जाऊ शकत नाही. तुम्ही अचानक निघून गेलात. मात्र, तुमच्या व्यावसायिक दृढनिश्‍चय आणि अनुकरणीय धैर्याबरोबर तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक बनून राहाल. तुम्हाला आमच्यापासून हिरावणारे भेकड आमचा आवाज दाबू शकत नाहीत. सत्य कितीही कठोर असले तरी सत्य सांगण्याच्या आपल्या सिद्धांताचे आम्ही पालन करत राहू. तुमच्या आत्म्याला शांती मिळो, असा संदेश या पानावर लिहिला आहे. बुखारी यांना श्रद्धांजली वाहण्याची ही योग्य पद्धत असल्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे. 

Web Title: Union Minister RK Singh's claim of ISI in the murder of Bukhari