Farmer Protest : अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर फडकावले खलिस्तानी झेंडे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

याआधी देखील भारतीय दुतावासासमोर याप्रकारची आंदोलने झाली आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थक लोकांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यांच्या विरोधाचा आसरा घेत भारतीय दुतावासाच्या बाहेर आंदोलन केलं. खलिस्तान समर्थकांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारत सरकारद्वारे भारतात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी केली. 

हेही वाचा - Farmer Protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून शेतकऱ्यांविरोधात 15 FIR

ही मागणी करताना आंदोलकांनी हातात खलिस्तानचे झेंडे घेतले होते. याआधी देखील भारतीय दुतावासासमोर याप्रकारची आंदोलने झाली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आंदोलकांनी दुतावासाबाहेर खलिस्तानचे झेंडे फडकावत महात्मा गांधींची प्रतिमा मलिन केली होती.

कृषी कायद्यांवरुन गेल्या पाच महिन्यांपासून देशात असंतोष आहे. हे कायदे काळे असून ते रद्दच केले जावेत, या मागणीसह जवळपास 62 दिवसांपासून प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आपल्या मागण्यांकडे जगाचे  लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात आले. मात्र, या परेडमध्ये गोंधळ झालेला पहायला मिळाल. काही ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांच्या दरम्यान संघर्षाचे वातावरण पहायला मिळाले. काही आंदोलकांनी ठिकठिकाणी हिंसा केली तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा देखील फडकावला. हे आंदोलक शेतकरी  नसून घुसखोर होते, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावण्यासाठीची चिथावणी भाजपशी संबंधित असलेल्या पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीप सिद्धूने भाजपचा खासदार सनी देओल याच्या निवडणुकीत प्रचार केला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United States Khalistan supporters protest Indian embassy Washington DC farm laws India