उन्नाव: बलात्कार प्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

व्हिडिओ व्हायरल 
पीडितेच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू होण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदाराच्या भावाने आपल्याला मारहाण केल्याचे या व्हिडिओत स्वतः पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे. मारहाणीत झालेल्या जखमाही ते दाखवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कारप्रकरणी भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकारी राजेशसिंह यांनी सांगितले.

या प्रकरणात यापूर्वीच कुलदीपसिंह यांच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. अतुलसिंह असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच, याप्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. उन्नाव येथील एका 18 वर्षीय मुलीने आपल्यावर भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्यांच्या भावांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आपल्या वडिलांना सेंगर आणि त्यांच्या भावांकडून मारहाण करण्यात आली होती. एवढे होऊनही पीडितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. आपल्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यूला आमदार सेंगर हेच कारणीभूत असल्याचा आरोपही पीडित मुलीने केला आहे. 

सेंगर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, हे आपल्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. अखेर या प्रकरणात सेंगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिडीतेच्या चुलत्यांनी म्हटले आहे, की सेंगर यांच्याविरोधात फक्त गुन्हा दाखल होऊन उपयोग नसून, त्यांना अटक झाली पाहिजे. 

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे रावणाचे सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांची तात्काळ पदावरून हाकालपट्टी करावी. 
- रणदीपसिंह सूरजेवाला, कॉंग्रेसचे प्रवक्ते 

व्हिडिओ व्हायरल 
पीडितेच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू होण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदाराच्या भावाने आपल्याला मारहाण केल्याचे या व्हिडिओत स्वतः पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे. मारहाणीत झालेल्या जखमाही ते दाखवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे.

Web Title: Unnao rape case FIR registered against BJP MLA Kuldeep Singh Senger