पणजीत स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

स्पीडब्रेकरची उंची कमी करावी अथवा स्पीडब्रेकर काढून टाकावे अशी मागणी सवेरा संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर यांनी केली. 

पणजी - सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे घालण्यात आलेले स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी डोकेदुखी झाले आहेत. बांबोळी, दाबोळी, वेर्णा, फोंडा रस्त्यावरील अधिक उंची असणाऱ्या स्पीडब्रेकरमुळे गरोदर महिलांनाही त्रास होत असल्याची तक्रार संस्थेकडे आली आहे. या स्पीडब्रेकरची उंची कमी करावी अथवा स्पीडब्रेकर काढून टाकावे अशी मागणी सवेरा संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर यांनी केली. 

एका महिलेला या स्पीडब्रेकरमुळे गर्भपाताला सामोरे जावे लागले. संबंधित महिला याच रस्त्यावरून गाडी चालवत होती. तिच्या घरच्यांनी मात्र या महिलेलाच दोषी ठरविले आहे. या स्पीडब्रेकरमुळे तिचे जर काही बरेवाईट झाले असते तर सरकार काय करणार होते? असा प्रश्‍नही यावेळी केरकर यांनी केला. 

स्पीड ब्रेकरचे प्रमाण जेथे अधिक आहे ते रस्ते महामार्ग असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा जास्त असते. अचानक समोर स्पीडब्रेकर असल्याचेही वाहन चालविताना लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. अपघात होऊन काही बरेवाईट होण्यापेक्षा हे स्पीडब्रेकर हटविणे कधीही चांगले असल्याचे केरकर म्हणाल्या. 

याबाबतीत सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना निवेदन दिले आहे. त्यांनी येत्या 15 दिवसाच्या आत हे स्पीडब्रेकर काढून टाकण्यासाठीची हालचाल करून प्रत्यक्ष कृती केली नाही तर प्रसंगी हातात कुदळ घेऊन आम्ही हे स्पीडब्रेकर स्वतः काढणार असल्याचा इशाराही केरकर यांनी दिला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: unnecessary speedbreakers at panaji goa