लोकसभेपूर्वी भाजपला धक्का; आणखी एक पक्ष 'एनडीए'तून बाहेर

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होती. नाराज असलेले कुशवाह या बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यानंतर कुशवाह यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला.

नवी दिल्ली : लोकसभेचे रणशिंग अजून अधिकृतरित्या फुंकले गेले नसले, तरीही संभाव्य जागावाटपाच्या मुद्यावरून राजकीय पक्षांच्या आघाड्यांवर लढाईला तोंड फुटले आहे. बिहारमधील जागावाटपावरून नाराज असलेले रालोसपाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी भाजपप्रणित 'एनडीए'ला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आज (सोमवार) घेतला. कुशवाह यांनी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होती. नाराज असलेले कुशवाह या बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यानंतर कुशवाह यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. दुपारी चारच्या सुमारास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची कुशवाह भेट घेण्याची शक्‍यता आहे. यावेळी कुशवाह कॉंग्रेसप्रणित बिगरभाजप पक्षांच्या आघाडीत सहभागी होण्याची घोषणा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

'आमचा सतत अपमान झाला. 'एनडीए'ला आम्ही खूप वेळ दिला. पण तरीही अपमान होणे थांबले नाही' असे रालोसपाचे खासदार रामकुमार शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही 'एनडीए'तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. 

बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाची युती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा प्रामुख्याने याच दोन पक्षांमध्ये होत आहे. त्यामध्ये पुरेसे स्थान मिळत नसल्याने कुशवाह नाराज होते.

Web Title: Upendra Kushwah quits NDA over seat sharing for Lok Sabha 2019