
Bachchu Kadu : बच्चू कडूंचं 'ते' विधान अन् आसामच्या विधानसभेत राडा; राज्यपालांनी आटोपलं अभिभाषण
गुवाहाटीः आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत भटक्या कुत्र्यांवरुन केलेल्या विधानाचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत पडले आहेत. विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी गोंधळ केला. त्यामुळे राज्यापालांना पंधरा मिनिटांमध्ये भाषण संपवावं लागलं.
आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेनामध्ये एक विधान केलं होतं. महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आसामला हे कुत्रे पाठवावेत. तिथे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं त्यामुळे तेथील व्यापाऱ्याशी संपर्क साधावा, असं कडू म्हणालेले.
त्यावरुन आज आसामच्या विधानसभेत गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकच गोंधळ केला. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे कटारिया यांना केवळ १५ मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपावं लागलं.
काँग्रेसच्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणी केली. शिवाय अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनी या मुद्द्याला राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये समाविष्ट करावं, अशी मागणी केली.
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचं सांगून आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा तिथे कुत्र्यांच मांस खाल्लं जात असल्याचं समजल्याचं सांगून राज्यातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.