शत्रू राष्ट्रांच्या मदतीने शहरी नक्षलवाद : मोहन भागवत

Urban Naxalism with the help of enemy nations says RSS Mohan Bhagwat
Urban Naxalism with the help of enemy nations says RSS Mohan Bhagwat

नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार) येथे केले.

येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, “सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिका येथून येतो की काय अशी शंका येते. "भारत तेरे टुकडे होंगे" असे नारे देणाऱ्या आंदोलकांमागे काही प्रमुख चेहरे आहेत. चिथावणीखोर भाषणांमुळे तेही लोकांना माहित झालेले आहेत. दहशतवादाशी संबंध ठेवणाऱ्या या लोकांच्या मनात अचानक पीडितांबद्दल संवेदना कशा निर्माण झाल्या, याचाही विचार व्हायला हवा.”

तत्पूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन व कवायतीही झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पद्मश्री उस्ताद रशीद खाँ व त्यांच्या पत्नी सोहा खान, केरळचे केंद्रीय राज्यमंत्री के.जे. अँथोन्स, आळंदीचे रामूजी महाराज आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडे यांची उपस्थिती होती.

राम मंदिरासाठी कायदा करा

लोक म्हणतात तुमचेच सरकार आहे तर मंदिर का बनत नाही. पण सरकार बदलल्याने मागण्या पूर्ण होतात हा भ्रम आहे आणि तो आजही कायम आहे. राजकारण आडवे आले नसते तर राममंदिर कधीचेच झाले असते. आता सरकारने लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा. यासंदर्भात देशात संत महात्मा जे पाऊल उचलतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे स्पष्ट मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

मतदान करून पश्चाताप ओढवून घेऊ नका

येत्या निवडणुकांमध्ये पुढील पाच किंवा अनेक वर्षे पश्चाताप होणार नाही, याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. उपलब्ध उमेदवारांपैकी सर्वोत्तम निवडा अन्यथा नोटाचा पर्याय आहे. पण नोटा वापरताना तो आत्मघाती ठरणार नाही, याचीही काळजी घ्या, असेही सरसंघचालक म्हणाले.

पोर्नोग्राफीवर बंदी हवी : कैलाश सत्यार्थी

सीमेवरील सुरक्षेसोबत अंतर्गत सुरक्षा देखील आवश्यक आहे. आजही देशात अल्पवयीन मुलींवर बलात्कार होतात. भाऊ बहिणीवर, बाप मुलीवर अत्याचार करतोय. याला इंटरनेटवरील पोर्नोग्राफीदेखील तेवढीच कारणीभूत आहे. हा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून, त्यावर बंदीची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत जगभरातील अनेक देशांनी एकत्र येऊन याविरोधात पाऊल उचलण्याची तयारी केली आहे, असे प्रतिपादन नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com