दबावापुढे न झुकण्याची परिणिती राजीनाम्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध करून देणे आणि थकीत कर्जांच्या वसुलीसाठीचे कडक नियम शिथिल करणे या तीन मुद्यांवरून रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने दबावापुढे न झुकण्याची भूमिका घेतल्याने पटेल यांच्यावर राजीनाम्याची पाळी आली असाच अर्थ लावला जात आहे.

रिझर्व्ह बॅंकेकडे सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त धनसाठा किंवा राखीव निधी आहे. सरकारला आवश्‍यकता असेल तर यातील काही भाग सरकारला देण्याची पद्धत पूर्वीही अमलात आणली जात होती. त्याचाच आधार घेऊन मोदी सरकारने हा निधी सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा लकडा रिझर्व्ह बॅंकेच्या मागे लावला होता; परंतु हा निधी आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी राखण्यात येत असतो. त्यामुळे पटेल व त्यांच्या संचालक मंडळाने त्याबाबत ताठर भूमिका घेतली. सरकारने त्याबाबत समंजस भूमिका घेण्याऐवजी बॅंकेची स्वायत्तता अमर्याद नाही असे सांगून कलमाचा संदर्भ देऊन सरकारच्या सूचनांच्या आधारे मुद्राविषयक धोरणे आखण्याचे बंधन रिझर्व्ह बॅंकेवर कसे आहे याची इशारेवजा जाणीव पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आली होती. तेव्हाच पटेल राजीनामा देतील अशी चर्चाही सुरू झाली होती.

गुरुमूर्तींची भूमिका प्रश्‍नचिन्हांकित
ऊर्जित पटेल यांनी अखेर राजीनाम्याचा मार्ग स्वीकारून स्वतःला या संघर्षातून मुक्त करून घेतले. पटेल यांच्या राजीनाम्यासाठी संचालक मंडळावरील सरकारचे प्रतिनिधी एस. गुरुमूर्ती यांची भूमिका ही प्रश्‍नचिन्हांकित राहील. त्याचप्रमाणे सध्याची राजवट ही संस्थांच्या स्वायत्ततेचा आदर करणारी नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Web Title: Urjit Patel Resign RBI