हल्ला झालेल्या नागरिकाच्या प्रकृतीत सुधारणा : स्वराज

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

अमेरिकेतील केंट येथे अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकेन नागरिकाची प्रकृती धोक्‍याबाहेर असून सुधारत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेतील केंट येथे अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकेन नागरिकाची प्रकृती धोक्‍याबाहेर असून सुधारत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

ट्विटरद्वारे स्वराज यांनी म्हटले आहे की, "भारतीय वंशाचा दीप राय याच्यावर अमेरिकेतील हल्ल्याची घटना ऐकून दु:ख झाले. मी दीपचे पिता सरदार हरपाल सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. दीपच्या हातावर गोळी लागल्याचे त्यांनी सांगितले. त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर असून सुधारत आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.'

दीपवर वॉशिंग्टनमधील केंट शहरात त्याच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवार हल्ला झाला होता. 'तुझ्या देशात निघून जा' म्हणत एका हल्लेखोराने हल्ला केला. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अज्ञात व्यक्तींनी दीपच्या घराबाहेर येऊन त्याच्यावर हल्ला केला. दीपवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केलेला नाही. मात्र, या घटनेकडे आम्ही गंभीर गुन्हा म्हणून पाहात आहोत, अशी माहिती केंटचे पोलिसप्रमुख केन थॉमस यांनी दिली. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दीपला शक्‍य ती सर्व मदत पुरविण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: US shooting: Deep Rai, out of danger, Sushma Swaraj tweets