कापडी पिशव्यांसाठी होणार नगरसेवक निधीचा वापर ; पाच लाखांची तरतूद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरण, प्राणिमात्र आणि समुद्रजीव यांची बेसुमार हानी होत आहे. त्यामुळे प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.

मुंबई : प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीनंतर कापडी पिशव्यांसाठी आता नगरसेवक निधीचा वापर होणार आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यासाठी नगरसेवक निधीमध्ये पाच लाख रुपयांची तरतूद करा, या ठरावाच्या सुचनेद्वारे केलेल्या मागणीला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली. दरम्यान, हा प्रस्ताव सकारात्मक अभिप्राय देऊन राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले. 

प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरण, प्राणिमात्र आणि समुद्रजीव यांची बेसुमार हानी होत आहे. त्यामुळे प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. प्लास्टिक वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपयांचा निधी वापरता येईल, अशा रितीने निधी वापरासंबंधीच्या निकषांत सुधारणा करण्यात यावी, असे भाजपच्या नगरसेविका जया तिवाना यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे. 

Web Title: Use of Corporator funds for cloth bags Provision of five lakhs