प्लॅस्टिकच्या वापराबाबत तज्ज्ञांची समिती; डॉ. माशेलकर अध्यक्ष 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पेट्रोकेमिकल उद्योग वाढण्यात प्लॅस्टिकचा मोठा हातभार असून, इतर अनेक उत्पादन क्षेत्रांमध्येही विविध प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, या उपयोगाबरोबरच प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाच्याही समस्या निर्माण होत असल्याने अनेक राज्यांनी एकदाच वापरण्यायोग्य असलेल्या प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे.

नवी दिल्ली : एकदाच वापरण्याजोग्या प्लॅस्टिकच्या व्याख्येबाबत संभ्रम असल्याने कारवाई करताना अडचणी येण्याबरोबरच अनेक उद्योगही बंद करावे लागले आहेत, त्यामुळे ही व्याख्या निश्‍चित करण्यासाठी आणि प्लॅस्टिक वापराबाबतचे इतर प्रश्‍न हाताळण्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 

पेट्रोकेमिकल उद्योग वाढण्यात प्लॅस्टिकचा मोठा हातभार असून, इतर अनेक उत्पादन क्षेत्रांमध्येही विविध प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, या उपयोगाबरोबरच प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाच्याही समस्या निर्माण होत असल्याने अनेक राज्यांनी एकदाच वापरण्यायोग्य असलेल्या प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे. मात्र, अशा प्लॅस्टिकच्या व्याख्येबाबत विविध मतमतांतरे असल्याने प्लॅस्टिकचे उत्पादक, त्याचा वापर करणारे उद्योजक आणि प्लॅस्टिकविरोधी कारवाई करणारी यंत्रणा यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या संभ्रमामुळेच अनेक राज्यांनी सरसकट अनेक प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदी घातल्याने व्यवसाय बंद पडून अनेक जणांचा रोजगार गेला आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाने या तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली आहे. प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या नियमांचा अभ्यास करणे, प्लॅस्टिकवरील बंदीच्या परिणामांचा अभ्यास करणे, हानिकारक प्लॅस्टिक कोणते ते ठरविणे आणि त्याच्या नियमनाची योजना आखणे, विकसित देशांनी केलेल्या उपायांचा अभ्यास करणे यासह इतर मुद्द्यांवर ही समिती काम करणार आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर पुढील दोन महिने तिचा कार्यकाल असणार आहे.

Web Title: use of plastic committee formed lead by Dr Raghunath Mashelkar president